कांदा दूध उत्पादक शेतकऱ्यांचा हमीभावासाठी दिवसभर ठिय्या
निलेश लंके यांच्यासह आघाडीचे नेते उपस्थित, बैलगाडीत बसून कांद्याची माळ गळ्यात
कांदा व दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही, राज्यातील दूध उद्योगाचे नियमन करणारा कायदा करावा, तसेच चाळीस रुपये हमीभाव देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश मोर्चा काढण्यात काढण्यात आला. यावेळी खासदार निलेश लंके यांच्यासह महाविकास आघाडीतील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. महापालिकेच्या कार्यालयासमोर मोर्चाला सुरुवात झाली. खासदार लंके यांनी गळ्यात कांद्यांची माळ घालत व बैलगाडीचा दोन हातात घेत मोर्चाचे नेतृत्व केले. जिल्ह्यातील दूध व कांदा उत्पादन उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घातल्या होत्या. तसेच हातात हमीभावाच्या मागणीचे फलक घेतले होते. आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांकडून सरकार विरोधी मोठी घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनात आणलेल्या गाई, म्हशी थेट जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेटला बांधल्या. त्यावेळी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना दूध वाटप करण्यात आले. यावेळी खासदार निलेश लंके म्हणाले, राज्य सरकारने जाहीर केलेले पाच रुपयांचे अनुदान 5% शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. दुधाला हक्काचा हमीभाव मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदानाची भीक नको सरकारने योग्य निर्णय दिला नाही तर, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छावणी टाकून बसू. सध्या फक्त जिल्ह्याच्या ठिकाणी आंदोलन केले आहे. सरकारने लवकरच निर्णय घेतला नाही तर, मुंबईमध्ये आंदोलन केले जाईल.