कान्हूरच्या दिंडीत मुस्लिमांच्या खांद्यावर पताका

सामाजिक एकतेची वारी मुस्लिम समाजाकडून अल्पोपहाराची सोय

पारनेर तालुक्यातील कान्हूरपठार येथील दिंडी प्रस्थान सोहळ्यात मुस्लिम बांधवांच्या खांद्यावर भगवी पताका पाहायला मिळाली. अगदी सहजपणे वारीत घडलेले हिंदू मुस्लिम एकत्रित दर्शन दिंडीत मात्र कौतुकाचा विषय झाले. दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी वारी दिंडी सोहळ्यात सहभागी होत, मुस्लिम बांधवांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडवले. कान्हूरपठार येथील मुस्लिम बांधवांनी दिंडीच्या प्रस्थानावेळी वारकऱ्यांसाठी अल्पपहाराची व्यवस्था केली. प्रस्थान सोहळ्यात सहभागी होऊन वारकऱ्यांना निरोप देण्याची मुस्लिम समाजाचे परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. कान्हूरपठार येथील दिंडीने संत निळोबाराय महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पिंपळनेरकडे प्रस्थान केले. या प्रस्थान सोहळ्यात मुस्लिम बांधवांनी वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेतली होती.