अहमदनगर : मोहरम उत्सवात प्रशासनाने सहकार्य करून सर्वतोपरी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीचे निवेदन 12 इमाम कोटला मोहरम उत्सव समितीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, सालाबाद प्रमाणे मोहरम उत्सव शहराचा आजरा होत असून, यावेळी आवश्यक ती काळजी घेणे आवश्यक आहे. नगर शहरातील मोहरम उत्सव हा सर्व जाती धर्माचा उत्सव आहे. भारतातील हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतिक म्हणून याकडे पाहिले जाते. शहरातील 12 इमाम कोटला येथे इमाम हुसेनची सवारी निघते. मोहरम उत्सवात रात्री बारापर्यंत पारंपारिक वाद्य वाजवण्याची परवानगी असते. सवारीवरील भाविकांना फुले वाहण्यासाठी व सवारीबरोबर चालणाऱ्या टेंब्यांवर तेल ओतण्याची सर्व धर्मीयांची श्रद्धा आहे. भाविक रात्रभर सवारीबरोबर असतात. ही 500 वर्षांची परंपरा आहे. तसेच शहरातील विविध भागातील यंग पार्ट्यांना सदर मिरवणुकीला कायद्याच्या चौकटीत विनाअट परवानगी देणे, कत्तलच्या रात्री वाद्यांना रात्री बारा वाजेपर्यंत परवानगी देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना द्यावे, अशी मागणी निवेदनात केली आहे. सवारी मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजून पॅचिंग करावे, मिरवणूक मार्गावर वीज वितरण कंपनीने स्ट्रीट लाईटची व्यवस्था करावी, मार्गावर सीसीटीव्ही लावावे, मिरवणुकीबरोबर सर्व सोयीयुक्त ॲम्बुलन्स, तसेच दोन मोबाईल शौचालयांची व्यवस्था असावी. 12 इमाम कोटला येथे सालाबादप्रमाणे जनरेटर, हॅलोजन लाईटची व्यवस्था करावी. आदी मागण्या केल्या आहेत.