चौथरा दर्शन बंद असूनही, शनिशिंगणापूरमध्ये शनि देवाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
मंदिर परिसर मानसतीर्थ, भुयारी दर्शन मार्गावर वाढली भाविकांची संख्या
कुकाणे : शनिदेव चौथर्याच्या जीर्णोद्धार कामामुळे शनिशिंगणापूरला चौथर्यावर जाऊन शनिदेव दर्शन बंद असले तरी, चौथर्याखालून दर्शन सुरूच असल्याने भाविकांची गर्दी शनिदेव दर्शनाला वाढत आहे. शनिशिंगणापुरात भाविकांच्या संख्या वाढत आहे. मंदिर परिसर, वाहनतळ, परिसर, मानसतीर्थ, भुयारी मार्ग या ठिकाणी वर्दळ वाढली आहे. शनिशिंगणापूर येथे शनिदेव चौथर्याचे नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने काम पूर्ण होईपर्यंतच्या काळात चौथर्यावर जाऊन दर्शन बंद ठेवण्यात आले आहे. पावसाळी वातावरण असल्याने दिवसभर शनीशिंगणापुरातील पानसतिर्थ सुशोभीकरण प्रकल्प, सप्तनद्या प्रतिकृती हे भाविकांच्या गर्दीचे सेल्फी पॉइंट ठरत आहे. वारसा व परंपरा यामुळे या स्थानाचे धार्मिक महत्त्व जगभर पोहोचले आहे. येथे दररोज भाविकांची गर्दी असते. शिर्डीला येणारे बहुतेक भाविक शिंगणापूरला शनी दर्शनाला येतात. त्यामुळे भाविकांची गर्दी दररोज शनी शिंगणापूरला दिसते शनिशिंगणापूरकडे येणारे सर्व रस्ते चकाचक झालेले आहेत. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्या दौऱ्यामुळे येथील देवस्थान कार्यालयाचे रूप बदलले आहे. देवस्थानाच्या वाहनतळावर वाहनांची गर्दी वाढली असून, या वाहन तळावरून भाविक थेट भुयारी दर्शन रांगेत जातात. हे वाहन तळ ठळकपणे दृष्टीस पडावे, म्हणून वाहन तळाच्या प्रवेशद्वाराचे कामही वेगाने सुरू आहे.