डेंग्यू रोखण्यासाठी आठवड्यातून एक दिवस स्वच्छता जनजागृती मोहीम

महापालिकेचा सहभाग, नागरिकांनीही सहभागी होण्याचे आवाहन

अहमदनगर : सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढवून डेंग्यूसह इतर साथीचे आजार वाढण्याचा धोका अधिक असतो. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने दर रविवारी स्वच्छता व जनजागृती मोहीम राबविण्याचे आदेश महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी दिले आहेत. ही मोहीम मनपाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यापासून सुरू करण्यात आली असून, यात नागरिकांनी सहभागी होण्याच आवाहन आयुक्तांनी केले आहे. शहरात हिवताप, डेंग्यू व चीकुन्गुनिया कीटकजन्य रोग उद्भवू नये यासाठी नागरिकांनी त्यांच्या रहिवासी परिसरात डासोत्पत्ती टाळणे आणि व्यक्तिगत काळजी घ्यावी याबाबत मनपातर्फे व्यापक जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे. डासांच्या अंड्यापासून प्रौढ डास बनण्याच्या प्रक्रियेला सात ते दहा दिवस लागतात. त्यामुळे हे चक्र तोडण्यासाठी कोरडा दिवस पाळणे आणि आपल्या घराच्या परिसरामध्ये डास उत्पत्तीची स्थान शोधून ती नष्ट करणे अशी अभियानाची संकल्पना आहे. सध्या मनपामार्फत कंटेनर तपासणी, धुरीकरण, कीटकनाशक फवारणीचे काम सुरू आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून सुरुवात मनपाने, मनपाचे सर्व विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी यांनी करावयाचे आहे. यांनी त्यांच्या स्वतःच्या घराच्या परिसरामध्ये अस्वच्छता व डास उत्पत्ती होणार नाही. याकरिता काळजी घेऊन परिसरातील नागरिकांमध्ये ही जनजागृती करावयाची आहे.
या दरम्यान नागरिकांनीही आपल्या घरात किंवा परिसरामध्ये असलेले रिकामे टायर, वापरलेले नारळ, खराब झालेल्या प्लास्टिकच्या वस्तू किंवा कुंड्यांमध्ये पाणी साठणार नाही. याची खबरदारी घ्यायची आहे. याशिवाय घराबाहेर असलेले हौत,पाण्याच्या टाक्या या वारंवार स्वच्छ कराव्या किंवा त्यामध्ये कीटकनाशक फवारणी करून घ्यावी. याद्वारे आपण सहज डासोत्पत्ती थांबवू शकतो.