बोगसगिरीला आळा घालण्यासाठी आता डॉक्टरांना क्यूआर कोड बंधनकारक
सहा महिन्यात रुग्णालयात लागणार क्यूआर कोड
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे नोंदणी असलेल्या डॉक्टरांना आता क्यूआर कोड दिला जाणार आहे. तो स्कॅन करताच संबंधित डॉक्टरची पदवी, पदविका तसेच अनुभव आदी माहिती पेशंटला कळू शकेल. यावर सध्या काम सुरू असून सहा महिन्यात हे क्यूआर कोड रुग्णालयात लावले जातील. अशी माहिती मेडिकल कौन्सिलचे प्रशासक डॉ. रुघवानी यांनी दिली आहे. बोगस डॉक्टरांना चाप बसवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. आयुर्वेद, होमिओपॅथी यासह इतर पॅथीच्या पदवी असताना किंवा कोणतीही पदवी न घेता ऍलोपॅथीची औषधे लिहून देणारे अनेक ऍलोपॅथीचे बोगस डॉक्टर सध्या राजरोस प्रॅक्टिस करत आहेत. अनेकदा ग्रामीण भागात एखाद्या डॉक्टरकडे काम करणारे कंपाउंडर रुग्णालय थाटतात. पैसे कमावण्यासाठी रुग्णांच्या जीवाशी खेळ केला जातो. अशा बोगस डॉक्टरांना चाप बसावा. आणि नोंदणीकृत डॉक्टरांची माहिती एका स्कॅनवर रुग्ण, नातेवाईकांना मिळावी. यासाठी एमएमसी ने क्यूआर कोडची संकल्पना आणली आहे. एमएमसीकडे एक लाख 94 हजार डॉक्टरांची नोंदणी आहे. त्यापैकी एक लाख 34 हजार डॉक्टरांनी पुर्ननोंदणी केली आहे. या नोंदणीकृत डॉक्टरांना एमएमसी हा क्यूआर कोड देईल. पुढील सहा महिन्यांमध्ये रुग्णालयात हे कोड लावले जातील. त्यामुळे रुग्णांना डॉक्टरची पदवी आणि इतर माहिती सुद्धा मिळू शकेल.