कर्जत – जामखेड मध्ये कॉंग्रेस पक्षाला कायम दुय्यम वागणूक.

जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांची मागणी

 
रोहित पवारांनी बारामतीतून लढावे कर्जत जामखेडची जागा काँग्रेसला द्यावी.
कर्जत-जामखेड  –   कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ हा पहिल्यापासून काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, यंदा तो बालेकिल्ला काँग्रेस पक्षालाच मिळावा अशी मागणी कर्जत – जामकेड कॉंग्रेस ने केली आहे.  मागील निवडणुकीत काँग्रेसने मित्रत्वाचा आणि आघाडीचा धर्म पाळला, आता राष्ट्रवादी शरद पवार गटाला बारामतीची जागा मोकळी झाली असून रोहित पवार यांनी बारामतीतुन लढावे. यंदा रोहित पवारांनी मैत्रीचा मान राखत कर्जत-जामखेडची जागा काँग्रेसला सोडावी अशी मागणी कर्जत-जामखेड तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे केली आहे. सोमवारी सायंकाळी कर्जत येथील विश्रामगृहावर काँग्रेस पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषद पार पडली, त्यात ही माहिती देण्यात आली. विधानसभेसाठी ज्येष्ठ नेते अॅड.कैलास शेवाळे यांच्या उमेदवारीची मागणीक कॉंग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केली आहे.  कर्जत-जामखेड मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. या मतदारसंघातून स्व.आबासाहेब निंबाळकर, दोन पंचवार्षिक निकाळजे गुरुजी तर एक पंचवार्षिक विठ्ठलराव भैलुमे यांनी काँग्रेसकडून प्रतिनिधित्व केलेले आहे. वर्ष २००९ मध्ये मतदार संघ खुला झाल्यानंतर स्व.बापूसाहेब देशमुख यांचा थोडक्यात पराभव झाला होता २०१४ मध्ये किरण पाटील यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. तर २०१९ मध्ये काही राजकीय तडजोडी व विनंती अंती ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात आली होती. आमदार रोहित पवार काँग्रेस आणि मित्र पक्षाच्या सहकार्याने आमदार झाले आहेत. परंतु निवडणूक आल्यानंतर त्यांनी कायम मित्र पक्षाला कायम दुय्यम वागणूक दिली. कधीही काँग्रेस पक्षाला आणि पदाधिकाऱ्यांना मानाचे स्थान दिले नाही अशी टीका यावेळी अॅड. कैलास शेवाळे यांनी केली आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका, नगरपंचायत निवडणूका, बाजार समितीच्या निवडणुकांत काँग्रेसला दुय्यमच वागणूक दिली आहे. त्यांच्या पक्षाचे लोक त्यांच्याबरोबर प्रामाणिक राहिले नाहीत. मात्र आम्ही काँग्रेस म्हणून त्यांच्याबरोबर प्रामाणिक राहिलो आहोत. परंतु आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत कर्जत-जामखेडची जागा ही काँग्रेसला मिळावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे करणार असल्याचे अॅड. शेवाळे यांनी यावेळी सांगितले. दक्षिणेत काँग्रेसला एकही जागा नाही. कर्जत-जामखेड हा काँग्रेसचा पारंपारिक मतदारसंघ आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसलाच मिळावी, ५ वर्षासाठी आम्ही ही जागा रोहित पवार यांना दिली होती. या मतदारसंघात काही प्रमाणात अजित पवारांचा चांगला प्रभाव आहे. आ.रोहित पवार हे अजित पवार यांच्यापासुन बाजूला गेल्याने मतांची विभागणी होणार आहे. आमचा काँग्रेसचा आमदार, आहे तसाच जागेवर आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसला फायदेशीर राहील असे मत शहाजीराजे भोसले यांनी व्यक्त केले.  पत्रकार परिषदेत काँग्रेसचे कर्जत तालुकाध्यक्ष किरण पाटील, जामखेड तालुकाध्यक्ष शहाजीराजे भोसले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते  अॅड. कैलास शेवाळे, तात्यासाहेब ढेरे, युवक काँग्रेसचे कर्जत तालुकाध्यक्ष सचिन घुले, युवक जामखेड तालुकाध्यक्ष राहुल उगले, ज्येष्ठ काँग्रेस नेते बापूसाहेब काळदाते, मुबारक मोगल, बाजार समितीचे संचालक अॅड. श्रीहर्ष शेवाळे,अमोल कदम आदी उपस्थित होते.