अमोल मिटकरी व मनसे कार्यकर्त्यांच्या झालेल्या वादंगानंतर मनसेच्या कार्यकर्त्याचा मृत्यू

राष्ट्रवादी (अजित पवार गट) विरुध्द मनसे, एकाचा मृत्यू

अकोला – मंगळवार ता.३० रोजी राज ठाकरे यांच्यावरती केलेल्या टिके नंतर अकोल्यातले मनसैनिक आक्रमक झाले होते. मनसैनिकांनी अमोल मिटकरींच्या गाडीवर हल्ला केला या हल्ल्यानंतर मनसे नेते आणि अमोल मिटकरी यांच्यातील शाब्दिक राडेबाजी झाली. मनसैनिकांवर कारवाई च्या मागणीसाठी अमोल मिटकरी यांनी आंदोलन देखील केल होतं. दिवसभर या सगळ्या घटना घडत असताना सायंकाळी मात्र एक दुर्दैवी घटना घडली. अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या मनसैनिकांपैकी एक असणारा जय मालोकर या २८ वर्षीय मनसैनिक तरुणाचा मृत्यू झाला. त्यानंतर या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं ते मिटकरींच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर नेमकं काय घडलं जय मालोकर या तरुणाचा मृत्यू कसा झाला ? २५ जुलै रोजी वांद्रे येथील रंग शारदा सभागृहात झालेल्या मनसे कार्यकर्त्यांच्या मिळाव्यात, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अजित पवार यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर पुण्यात झालेल्या पावसामुळे पुण्यातल्या काही भागात पाणी साचल्यानंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत, महायुती सरकार वर निशाणा साधला होता. पाऊस पडल्यानंतर दरवाजे उघडले जातील त्याचा लोकांना त्रास होणार नाही याचं कोणतं प्लॅनिंग केलेलं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तर पुण्यात आहे सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला होता. अजित पवारांवर टीका करताना दहा वर्षांपूर्वी धरणावर केलेल्या वादग्रस्त विधानावरून राज ठाकरेंनी अजित पवारांना डिवचण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि मनसे या दोन्ही पक्षातल्या नेत्यांमध्ये जोरदार वाद सुरु झाला होता. राज ठाकरेंनी केलेल्या या टिके नंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली. सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत त्यांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले, यावेळी त्यांनी राज ठाकरेंची विश्वासार्हता संपलेली असून, त्यांना कुठल्याही आंदोलनात यश आलं नाही. इतिहासात सर्वात यशस्वी ठरलेल्या व्यक्तीने अजित दादांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं म्हणजे हे सूर्याला वाकून दाखवण्यासारखे आहे, राज ठाकरे हे सुपारीबाज आहेत, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली होती. यावेळी मिटकर यांनी राज ठाकरेंचा उल्लेख सुपारीबाज असा केला. त्यानंतर मनसेचे नेते आणि कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले.

मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांच्यासह इतर नेत्यांनी मिटकरींना धारेवर धरत त्यांच्यावर टीका केली. मंगळवारी अमोल मिटकरी यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर मनसे पदाधिकारी जय मालोकर याचा मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी दोनच्या दरम्यान अमोल मिटकरी अकोल्यातल्या शासकीय विश्रामगृहावर शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आले होते. त्यावेळी अकोल्यातले मनसेचे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांच्यासह काही मनसैनिकांनी थेट विश्रामगृहात जाऊन मिटकरी यांच्यावर संताप व्यक्त केला. यावेळी मनसैनिकांकडून मिटकरींना शिवीगाळ ही करण्यात आली. दरम्यान हा शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. विश्रामगृत शिरलेल्या मनसैनिकांपैकी एक मनसे विद्यार्थी सेनेचा जिल्हा उपाध्यक्ष जय मालोकर हा होता. या प्रकरणाच्या व्हायरल व्हिडिओमध्ये देखील इतर कार्यकर्त्यांमध्ये जय मालोकर दिसत आहे. विश्रामगृहात शिरल्यानंतर मिटकरी समर्थक आणि मनसैनिकांमध्ये बाचाबाची आणि धक्काबुकी झाली. अमोल मिटकरी ज्या खोलीत होते, त्या खोलीचे दार उघडण्याचा प्रयत्न हा मनसैनिकांनी केला, मात्र अमोल मिटकरी ना बाहेर काढण्यासाठी आणि राज ठाकरेंची माफी मागण्यासाठी मनसैनिकांनी आरडाओरडा करत होते. दरम्यान, पोलिसांनी मनसैनिकांना बाहेर काढल्यानंतर संतप्त मनसैनिकांनी विश्रामगृहाबाहेर असलेल्या अमोल मिटकरी यांच्या गाडीवरती हल्ला केला. मनसैनिकांनी मिटकरींच्या गाडीच्या काचा फोडल्या, तसेच ते घाबरून लपुन बसल्याची टीका सुद्धा त्यांच्यावर केली. त्यानंतर मनसैनिकांनी मिटकरींना धमकी सुद्धा दिल्याचे सांगण्यात येत आहे. या सगळ्या नंतर अमोल मिटकरींनी प्रतिक्रिया देऊन मनसेचा समाचार घेतला. माझं घर हे पेटवून देण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण माझ्या घरच्यांच्या जीवावरचं संकट हे माझ्यावर आलं, मी गाडीत नसल्याने मी सुरक्षित राहिलो. त्यानंतर हल्लेखोरांवर कारवाई करण्यासाठी आंदोलनाला मिटकरींनी सुरुवात केली. दुपारपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह अमोल मिटकरी हे अकोल्यातल्या सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये आंदोलन करत होते जोपर्यंत आरोपी मनसे कार्यकर्त्यांना अटक होत नाही. तोपर्यंत आपण हरणार नाही असं मिटकरी यांनी म्हटल होतं. कार्यकर्त्यांनी पोलिसांना भेटून नंतर पळ काढल्याचा गंभीर आरोप सुद्धा मिटकरींनी केला होता, त्यानंतर त्या प्रकरणात पोलिसांनी मनसेच्या १३ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला. त्यापैकी १३ कार्यकर्ते हे फरार झाले होते, जय मालोकर देखील त्यामध्ये होता. परंतु या सगळ्या राड्यानंतर मालोकरला अस्वस्थ वाटायला लागलं, अचानक त्याच्या छातीत दुखायला लागल्यामुळे त्याला तातडीने अकोल्यातल्या केअर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं, जय मालोकर हा फक्त २८ वर्षांचा असल्याने त्याला नेमकं काय झालं असावं याचा कोणालाही अंदाज लागत नव्हता हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर त्याचा ईसीजी काढण्यात आला. त्यानंतर त्याला तातडीने अंजॉग्रफी साठी साडेसात वाजता पाठवण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. आंदोलनासाठी गेलेल्या २८ वर्षीय जय मालोकरचा तरुण वयात दुर्दैवी अंत होईल अशी कल्पनाही कोणीही केली नव्हती. त्यामुळे जयच्या मृत्यूनंतर शोक व्यक्त करण्यात येत आहे. दुसरीकडे जय मालोकर च्या मृत्यूसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जबाबदार आहेत, असा आरोप त्याच्या घरच्यांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान या घटनेनंतर अमोल मिटकरींनी सुद्धा त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. मला खूप वाईट वाटतंय दुपारी झालेल्या राड्यात एक तरुण मुलगा कोणाच्यातरी सांगण्यावरुन राड्यात गेला, आणि नंतर त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मृत्यू झालेला तरुण त्याच्या पक्षाच्या सांगण्यावरून, पक्षाचं प्रामाणिकपणे काम करत होता. परंतु, अभ्यास करणारा तरुण जाणं याच वाईट वाटतंय राजकारणाच्या या स्तरावर कुणीही जाऊ नये. ही घटना घडली याचं तीव्र दुःख असुन, मी सुद्धा त्याच्या परिवाराची भेट घेईल. जरी त्यांना भावनेच्या भरात काही केलं असलं, तरी एका कष्टाळू मायबापाचे लेकरू गेल्यामुळे मला त्याचं नितांत दुःख आहे. अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी दिली आहे. यावेळी अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंना सुद्धा आवाहन केलं आहे. की, त्यांनी मुंबई सोडून इथे यावं. सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा जीव जाईपर्यंत जर तुमचं राजकारण असेल, या घटनेत कुठलेही राजकारण आणणार नाही. मी जर माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना अशी चितावणी दिली असती आणि त्यामध्ये एखाद्याचा मृत्यू झाला असता तर त्याच्या आई-वडिलांना काय उत्तर दिलं असतं. माझा पक्ष तसा आदेश मला देत नाही. मी राजकारणाच्या पलीकडे पाहतो. मालोकार कुटुंबियांच्या दुःखात मी सामील आहे. परंतु एखाद्याचा जीव जाणं आणि अशा प्रकारे एखाद्या गोरगरीबाच्या मुलांच्या खांद्याचा वापर जर कोणता पक्ष कार्यरत असेल, तर त्याचा निषेध झाला पाहिजे. अशा शब्दात मिटकरी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मनसेच्या नेत्यांकडुनही शोक व्यक्त करण्यात आलाय. तसेच पोलिसांकडुन अमोल मिटकरी यांच्या घराबाहेरची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. पण आपल्या नेत्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे आंदोलन करणारा जय मालोकरचा अवघ्या २८ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने, सर्वच स्तरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच मनसैनिक पंकज साबळे आणि गौरव भगत यांना अटक करण्यात आली आहे.