१५ वर्षांचा संघर्ष ; अद्यापही आउट ऑफ कव्हरेजच

डोंगर दऱ्यांच्या दोन गावात मोबाईला रेंजच नाही !

केडगाव : रांजणी व माथनी हे नगर तालुक्यातील गर्भगिरी डोंगररांगेच्या कुशीत वसलेली जुळी टुमदार गावे आहेत. डोंगरदऱ्यांच्या  भागमध्ये ही गावे आहेत. यामुळे साऱ्या जगाला मोबाइलचा रेंज आला असला तरी, रांजणी आणि माथनी ही गावे मात्र नेहमीच मोबाइल फोनच्या रेंजसाठी झडपड करत आहे. यामुळे गावकऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. मोबाइलला गावात रेंज मिळावी म्हणून गावकऱ्यांचा मोठा संघर्ष सुरू आहे. रांजणी व माथनी ही गावे नगर शहरापासून साधारण वीस किलोमीटरवर आहे. माथनीची लोकसंख्या ९५०, तर मोबाइल वापरणाऱ्यांची संख्या ६०० इतकी आहे. रांजणीची लोकसंख्या १९०० इतकी आहे, तर मोबाइलधारकांची संख्या १२०० च्या घरात आहे. मोबाइलला रेंज नसल्याने गावकरी, विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अनेकदा तातडीच्या कामाच्या वेळी गावातील लोकांचा संपर्क होत नसल्यामुळे जीवितहानी होण्याच्या घटनाही घडल्या. दोन्ही गावांत मोबाइल टॉवर उभारून वर्ष झाले, मात्र गावामध्ये मोबाईला रिंग वाजण्याची प्रतीक्षा अजूनही संपलेली नाही. बीएसएनएल कंपनीने टॉवर उभारणीचे काम मागील वर्षीच्या एप्रिल महिन्यात हाती घेतल्याने महिनाभरात रांजणी आणि माथनी या गावांत मोबाइल फोन खणखणणार, असे म्हणत मोठा आनंद साजरा केला गेला. मात्र, टॉवर उभारून वर्ष होऊनही गावांत मोबाइलला रेंज मिळालेली नाही.

•  टॉवर मात्र उभारले, पण त्याला रेंजच नाही 

• गावकऱ्यांनी एकत्र येत मोबाइल टॉवरसाठी पाठपुरावा सुरू केला. अर्ज, निवेदने दिली. अधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या. मात्र, गावकऱ्यांच्या प्रयत्नांना काही यश मिळाले नाही. माथनीचे माजी सरपंच  महेश वाघ व रांजणीचे माजी सरपंच दिलीप झिपुर्डे यांच्यासह गावकऱ्यांनी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांच्याकडे मोबाइल टॉवरसाठी साकडे घातले. त्यानंतर प्रक्रिया सुरू झाली. 

• मागील वर्षीच्या एप्रिलमध्ये गावात बीएसएनएल कंपनीने मोबाइल टॉवर उभारणीचे काम सुरू केले. मात्र, टॉवर उभारून वर्ष उलटले तरी गावात काही रेंज आली नाही. गावकरी दररोज पाठपुरावा करत आहेत. मात्र, आश्वासनापलीकडे अद्याप त्यांच्या हाती काहीच लागले नाही.