बालविवाह आणि कुटुंबवंचित बालकांच्या समस्यांवर, युवा शिबिरमध्ये प्रबोधन

अहमदनगर : बालविवाह आणि कुटुंबवंचित बालकांच्या समस्यांवर यंदाच्या ३२ व्या युवा प्रेरणा शिबिरातून महाराष्ट्रव्यापी  प्रबोधन आणि संघटन केले जाणार आहे. त्यातून वर्ष २०२७ अखेर बालविवाहमुक्त महाराष्ट्र आणि कुटुंबयुक्त बालक अभियानाची पायाभरणी केली जाणार आहे. येत्या १० ते १५ ऑगस्ट दरम्यान स्नेहालय संस्थेच्या इसळक (ता.जि.नगर) येथील मानसग्राम प्रकल्पात होणाऱ्या या  राज्यस्तरीय निवासी युवा शिबिरात १७ ते ३० वर्ष वयोगटातील २५० निमंत्रित युवा आणि विद्यार्थी सहभागी होत आहेत. शिबिराचे आयोजन स्नेहालय संस्थेचा युवानिर्माण प्रकल्प आणि रोटरी क्लब ऑफ अहमदनगर यांनी संयुक्तपणे केले आहे.

सामाजिक प्रश्नांची उकल करण्यात पुरोगामी कायदा सहाय्यभूत  ठरतो. तथापि भारतीय समाज रूढीग्रस्त आहे. त्यामुळे केवळ कायद्याने कोणताच सामाजिक बदल होत नाही. त्यासाठीची ठोस उपयोजना ही समाजाची मानसिकता बदलून आणि प्रतिबंधक कार्यासाठी समाजातील तरुणाईचे कृतिशील संघटन  सक्रिय करूनच होते, ही स्नेहालय संस्थेची भूमिका आहे. त्यानुसार वर्ष २००५ पासून विविध सामाजिक प्रश्नांवर स्नेहालयाच्या युवा निर्माण प्रकल्पाने तरुणाईचे प्रबोधन आणि संघटन हे शिबिरे, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सायकल यात्रा, जन आंदोलने यांच्या माध्यमातून सातत्याने केले. या उपक्रमात सहभागी झालेल्या तरुणांनी विविध सामाजिक प्रश्नांवर काम करणाऱ्या सामाजिक संस्था आणि चळवळी भारताचे विविध भागात सुरू केल्या आहेत. तरुणाईचे चारित्र्यनिर्माण आणि जगण्यासाठी त्यांना  सेवाकार्याचा अनुरूप  उद्देश देण्याचा सफल प्रयत्न युवानिर्माण प्रकल्प करीत आहे.