महापालिका कर्मचारी युनियन उपोषणाचा आठवा दिवस सुरू!
महापालिका कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी कर्मचारी युनियनच्या वतीने सुरू केलेले उपोषण आठव्या दिवशी सुरूच होते. सरकारने दखल न घेतल्याने सोमवारी शहरातील साफसफाई आणि आरोग्य केंद्रातील वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात आली. कामगारांनी महापालिकेत एकत्र येऊन निदर्शने केली. उपोषणकर्ते बाबासाहेब मुदगल, जितेंद्र सारसर, बाबासाहेब राशिनकर यांची तब्येत खालावली असून त्यांना सलाईन लावण्यात आले आहे. तसेच, युनियन पदाधिकारी नंदकुमार नेमाणे व अजय सौदे या दोघांनीही कालपासून उपोषण सुरू केले आहे. सरकारकडून तत्काळ निर्णय न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. प्रशासक यशवंत डांगे व आमदार संग्राम जगताप शासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. त्यांच्याशी चर्चेनंतरसोमवारी काही भागात पाणीपुरवठा सुरू ठेवला होता. मात्र, रात्रीपर्यंत निर्णय न झाल्यास मंगळवारी पाणीपुरवठा करणार नाही, असा निर्णय कामगारांनी घेतल्याचा इशाराही सचिव आनंद वायकर आणि माजी अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी दिला.