सावेडीत तृतीयपंथीयांसह इतर समाजाच्या स्मशानभूमीसाठी जागा निश्चित

नवीन जागेत काम होणार सुरू

सावेडी उपनगरातील कचरा डेपोच्या जागेत तृतीयपंथीयांसाठी तसेच विविध समाजासाठी स्मशानभूमी तयार कण्यात येणार आहे. हे काम येत्या काही दिवसांत सुरू होणार असल्याचे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी सांगितले. शनिवारी स्मशानभूमीच्या कामाचे भूमिपूजन झाले. यावेळी आमदार संग्राम जगतात, माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, मीना चव्हाण, शिवाजी चव्हाण, सतीश बारस्कर, तृतीयपंथी संघटनेच्या अध्यक्षा काजल गुरू, दिलीप बारस्कर, बाबासाहेब बारस्कर, गणेश बारस्कर, लैला शेख, सपना शेख, संध्या शेखआदी उपस्थित होते.याप्रसंगी बारस्कर म्हणाले, सावेडी उपनगराचा अनेक वर्षांचा स्मशानभूमीचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून, कचरा डेपोच्या जागेत सर्व जातीधर्मातील लोकांसाठी स्मशानभूमी तयार होत आहे. तृतीयपंथी, कोल्हाटी, पारधी समाजाला देखील या स्मशानभूमीमध्ये जागा देण्यात आली आहे. महापालिकेत कचरा डेपोचा ठराव रद्द करून स्मशानभूमी, स्पोर्ट कॉम्प्लेक्स, हॉस्पिटल, गार्डन यासाठी ठराव करण्यात आला आहे. स्मशानभूमीचे काम तातडीने सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले, काजल गुरू म्हणाल्या, तृतीयपंथीयांची समस्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होती ती मार्गी लागावी यासाठी जिल्हाधिकारी, आयुक्त यांच्याकडे पाठपुरावा केला होता. अखेर आमच्या स्मशानभूमीचे काम मार्गी लागत असल्याचे समाधान आहे असे केले .