अहिल्यानगरमधील बोल्हेगाव परिसरातील चैतन्य क्लासिक हॉटेल ते गांधीनगर परिसरात अवैध दारू विक्री, मटका जुगाराचे अड्डे राजरोसपणे सुरू आहेत. त्याचा या भागातील महिलांना त्रास होत आहे. हे अवैध धंदे बंद करा, अन्यथा मुंबई येथील पोलिस आयुक्त कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या शेतकरी आघाडीच्या वतीने निवेदनाद्वारे सोमवारी देण्यात आला. संभाजी ब्रिगेडच्या शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ कराळे यांनी पोलिस महासंचालकांकडे ई- मेलद्वारे तक्रार केली आहे. निवेदनात चैतन्य क्लासिक हॉटेल ते गांधीनगर या भागात शाळा, महाविद्यालये आहेत. या मार्गावर महिला व मुलींची वर्दळ असते. परंतु, या मार्गावरच अवैध दारू विक्री, जुगाराचे अड्डे, मटका, गुटखा विक्री राजरोसपणे सुरू आहे. त्याचा त्रास रस्त्याने ये-जा करणाऱ्या मुली व महिलांना होतो. भीतीपोटी महिला व मुली पोलिसांत तक्रार देत नाहीत. अवैध व्यवसायांमुळे या भागात गुंडगिरी व दहशत वाढली आहे. हा भाग एमआयडीसी व तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत येतो. या दोन्ही पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी इकडे फिरकत नाहीत.