घर घर लंगर सेवेने वंचितांच्या अंगणात आनंदाचा दिवा केला प्रज्वलीत!
रुग्णालयातील नातेवाईक, बांधकाम कामगार व रस्त्यावरील वंचितांची दिवाळी झाली गोड.
अहिल्यानगर – शहरातील जिल्हा रुग्णालय, रस्त्याच्या कडेला विविध साहित्य विक्री करुन पालमध्ये राहणारे, रस्त्यावर उघड्यावरचे जीवन जगणारे व सार्वजनिक प्रकल्पांचे बांधकाम करणाऱ्यांच्या अंगणात दिवे प्रज्वलीत करुन घर घर लंगर सेवेच्या वतीने दिवाळी साजरी करण्यात आली. घरापासून लांब असलेल्या या दुर्बल घटकातील नागरिकांची दिवाळी गोड करण्याचे काम लंगर सेवेच्या सेवादारांनी केले. त्यांच्या सोबत फुलझड्यांची आतषबाजी करुन त्यांना दिवाळीच्या फराळाचे पाकिट वितरीत करण्यात आले. दिवाळीनिमित्त अनोळखी व्यक्तींकडून मिळालेल्या या अनोख्या भेटीने वंचित व कामगार वर्ग भारावले. दिवाळी पाडव्याच्या दिवशी झालेल्या या उपक्रमात हरजितसिंह वधवा, प्रितपालसिंह धुप्पड, राजेंद्र कंत्रोड, मुन्नाशेठ जग्गी, राजा नारंग, सुनील थोरात, कैलाश नवलानी, डॉ. संजय असणानी, दिनेश चोपडा, सिमरजीतसिंग वधवा, मन्नू कुकरेजा आदी लंगर सेवेचे सेवादार सहभागी झाले होते. लंगर सेवेचे सेवेदार जिल्हा रुग्णालयात दाखल होऊन रुग्णांच्या नातेवाईकांना दिवाळी साजरी करण्यासाठी बाहेर येण्याचे आवाहन केले. तर रुग्णालयाबाहेर पणत्या प्रज्वलीत करुन सर्वांसाठी सदृढ आरोग्याची प्रार्थना करण्यात आली. घरापासून लांब असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांसह फुलझड्या पेटवून त्यांना दिवाळीचे फराळ भेट देण्यात आले. रस्त्यावर विविध व्यवसाय थाटून पालमध्ये राहणारे व रस्त्याच्या कडेला झोपणाऱ्या दुर्बल घटाकातील कुटुंबीयांच्या अंगणात तर बुरुडगाव रोड येथील मनपाच्या हॉस्पिटलचे काम करणाऱ्या कामगारांसह लंगर सेवेच्या माध्यमातून दिवाळी साजरी करुन त्यांना फराळाच्या पाकिटांची भेट देण्यात आली. वंचितांच्या झोपड्यात जाऊन आनंदाचा दिवा प्रज्वलीत करण्यात आला. कोरोनाच्या संकटकाळात गरजू गोर-गरीब घटकातील भुकेलेल्यांना जेवण व इतर गरजूंना मदत पोहचविणाऱ्या घर घर लंगर सेवेच्या माध्यमातून दरवर्षी वंचितांची दिवाळी आनंदमय व गोड केली जात आहे. दिवाळी हा आनंद वाटण्याचा सण असून, या भावनेने हा उपक्रम राबविला जातो.