अहिल्यानगर महानगरपालिकेत ई ऑफिस प्रणालीच्या माध्यमातून ऑनलाईन कामकाज

राज्यातील ड वर्ग महानगरपालिकांमध्ये ऑनलाईन कामकाज करणारी पहिलीच महानगरपालिका कामांचे प्रस्ताव, मंजुरीची प्रकरणे, निर्णयांची अंमलबजावणी जलदगतीने होणार : आयुक्त यशवंत डांगे

अहिल्यानगर – इंटरनेटचा वाढता प्रसार आणि सरकारी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देण्याच्या लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. ऑनलाईन कामकाजामुळे वेळेची बचत होऊन नागरिकांचे अर्ज, कामांचे प्रस्ताव, इतर प्रकरणांवर जलद निर्णय घेणे शक्य आहे. त्यामुळे अहिल्यानगर महानगरपालिकेत ‘ई ऑफिस’ प्रणाली कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली. कामकाजाला गती देण्यासाठी ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून, यामुळे प्रशासकीय प्रस्ताव जलदगतीने मार्गी लागून नागरिकांची कामे वेळेत होतील, असा विश्वास आयुक्त यशवंत डांगे यांनी व्यक्त केला. अशी प्रणाली राबवून ऑनलाईन कामकाज करणारी अहिल्यानगर महानगरपालिका ही ड वर्ग महानगरपालिकांमध्ये पहिलीच पालिका ठरल्याचेही त्यांनी सांगितले.

आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या संकल्पनेतून ‘ई ऑफीस’ प्रणाली राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभाग, आस्थापना विभाग, संगणक विभाग, भांडार विभाग या विभागांचे कामकाज तात्काळ ई ऑफीस प्रक्रियेने सुरू करण्यात आले. मंगळवारी आयुक्त यशवंत डांगे यांनी या प्रणालीचे उद्घाटन करून विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याकरीता सार्वजनिक सूट्टीचा आदेश डिजिटल स्वाक्षरी करून विभागांना ऑनलाईन जारी केला. यावेळी उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंडे, डॉ. संतोष टेंगळे, सहाय्यक आयुक्त मेहेर लहारे, संगणक विभाग प्रमुख अंबादास साळी, शहर अभियंता मनोज पारखे, जलअभियंता परिमल निकम,शेखर बनकर,संतोष राठोड आदींसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.ई-ऑफिस करीता महाराष्ट्र शासनाच्या वतीने विजय पाटील,जयेश खैरनार,गिरीश सुंकी यांचे विशेष सहकार्य लाभले

ई ऑफिस प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी या प्रणालीवर सर्व कर्मचाऱ्यांचे आयडी, डिजिटल स्वाक्षरी, कार्यालयातील आस्थापना तक्ता अद्ययावत करण्यात आला आहे. त्यानुसार सर्व सॉफ्टवेअर संगणक विभागाकडून अ‌द्यावत करण्यात आले आहेत. ई ऑफिस प्रणालीमध्ये फाईल्सचा जलद गतीने निपटारा होणार आहे. वेगवेगळ्या स्तरावर फायलींच्या मंजुरी, त्यावर होणारा मनुष्यबळाचा खर्च, वेळेची बचत होऊन तात्काळ निर्णय होणार आहेत. या प्रणालीमध्ये कामकाज पेपरलेस होवून, फायली सांभाळण्याकरीता लागणारी यंत्रणा, त्यावर होणाऱ्या खर्चाची बचत तर होईलच, यासह फायली गहाळ होण्याचे टळतील, असे आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले.

दरम्यान, ई ऑफिस प्रणालीच्या माध्यमातून महानगरपालिकेतील प्रशासकीय कामकाज पहिल्या टप्प्यात ऑनलाईन करण्यात येत आहे. सर्व विभागांचे कामकाज ई ऑफिस प्रणालीच्या माध्यमातून सुरळीत झाल्यावर दुसऱ्या टप्प्यात नागरिकांना ऑनलाईन सेवा सुरू करण्याचा प्रयत्न आहे. महानगरपालिकेच्या माहिती व सुविधा केंद्राचे कामही ई ऑफिसच्या प्रणालीद्वारे ऑनलाईन करण्याचा प्रयत्न असल्याचे आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले.