शहरामध्ये एक महिना आधीच पारा चार अंशाने घसरला!

शहराचे किमान तापमान १७ अंशावर; गेल्या आठवड्यात शहराचे किमान तापमान होते २० अंश सेल्सिअस

अहिल्यानगर : थंडीचा कडाका आता वाढू लागला आहे. गेल्या १२ दिवसांत तापमानाचा पारा ४ अंशांनी घसरला असून, सोमवारी शहराचे किमान तापमान १७ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले होते. तत्पूर्वी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात शहराचे किमान तापमान २० अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले होते. बुधवारीदेखील तापमानाचा पारा १७ अंश सेल्सिअस होता. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात शहराचे किमान तापमान १७ अंश सेल्सिअस होते. यंदा, मात्र नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यातच शहराचे किमान तापमान १७ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे.

ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या तीन दिवसांपासून तापमानात घसरण होण्यास सुरुवात झाली. शनिवारी (९ नोव्हेंबर) किमान तापमान १९.५, तर कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस इतके होते. १० नोव्हेंबर (रविवार) शहराची किमान तापमान १८ अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस इतके नोंदवले होते. सोमवारी यात आणखी घसरण झाली. सोमवारी शहराचे किमान तापमान १७, तर कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस इतके होते. मंगळवारीदेखील किमान तापमान १७ अंश सेल्सिअस इतके होते. बुधवारीदेखील पारा घसरला होता. पुढच्या आठवड्यापासून पारा आणखी घसरणार असून, थंडीबरोबरच वातावरणात गारठादेखील वाढला आहे. गेल्या वर्षी या कालावधीत किमान तापमान २१ अंश सेल्सिअस इतके नोंदवले होते. सायंकाळी पाच वाजेपासूनच गारठा वाढल्याने ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. शहरात थंडीच्या पार्श्वभूमीवर गरम कपड्यांचे दुकाने सुरू झाली असून, सध्या नेपाळमधून आलेल्या उबर कपड्यांना ग्राहकांकडून चांगली मागणी आहे.

◈ रब्बी हंगामासाठी थंडी पोषक

यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. चांगल्या पावसामुळे खरिपाच्या उत्पन्नात देखील वाढ झाली आहे. खरिपाबरोबरच रब्बी हंगामाच्या शेती उत्पादनात देखील वाढ होण्याची शक्यता आहे. रब्बी हंगामातील महत्त्वाचे पीक असलेल्या गव्हासाठी ही थंडी पोषक ठरणार आहे.