जिल्ह्यातून दररोज एक अल्पवयीन मुलगी गायब; नऊ महिन्यात ४१० मुली बेपत्ता
अहिल्यानगर : जिल्ह्यात दर दिवसाला एक अल्पवयीन मुलगी गायब होत असल्याचे समोर आले आहे. मागील नऊ महिन्यात ४१० अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याचे गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच, ७४ अल्पवयीन मुलेही पळवल्याची नोंद झाली आहे. अद्याप १५० मुलींचा शोध पोलिसांकडून घेतल जात आहे. मागील काही वर्षापासून प्रेमसंबंधातून अल्पवयीन मुली पळून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात दर दिवसाला एक अल्पवयीन मुलगी गायब होत आहे. गायब झालेल्या मुलींमध्ये १५ ते १८ वर्षातील मुली गायब होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. अगदी दहावीच्या वर्गात शिकणारी मुलगीही प्रेमात पडून प्रियकरासोबत पळून गेल्याच्या घटना समोर येत आहेत. १८ वर्षांच्या आतील मुलगा अथवा मुलीला पळवून नेले किंवा बेपत्ता झाली, तर अपहरणाचा गुन्हा दाखल केला जातो. त्यानुसार जिह्यात जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यात ४१० अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी २०७ मुलींचा शोध लागला असून, १५० मुलींचा शोध सुरू आहे. तसेच, जिल्ह्यात ७४ अल्पवयीन मुलांना पळवल्याचीही नोंद आहे. त्यातील ५९ मुले सापडली असून, १४ जणांचा शोध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे.