स्नेहालयात रंगली राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धा

अवघ्या 5 मिनीटात गणिताचे पेपर सोडवून विद्यार्थ्यांनी केले अवाक

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

नगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी येथील स्नेहालयात युनिव्हर्सल अबॅकस ॲण्ड वैदिक मॅथस असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेली राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत विविध जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सकाळच्या सत्रात घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी मोठमोठी गणिते झटपटपणे सोडवित अवघ्या 5 मिनीटाच्या आतमध्ये आपला पेपर सोडवित उपस्थितांना अवाक केले.
ही स्पर्धा ज्युनिअर, मास्टर ज्युनिअर, लेवल 1 ते 5 व वैदिक मॅथ्स या गटात घेण्यात आली. 5 मिनीटाच्या राऊंडमध्ये अवघड गणिती प्रक्रियेचे पेपर विद्यार्थ्यांनी अत्यंत जलदगतीने सोडविली. यामध्ये नगर, पुणे, शेवगाव, संभाजीनगर, दौंड, श्रीगोंदा, सोनई, कल्याण, नवी मुंबई, मिरजगांव येथून विद्यार्थी सहभागी झाले होते.
स्पर्धेनंतर झालेल्या पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून नगरसेविका दिपाली बारस्कर, स्नेहालयाचे कार्याध्यक्ष अनिल गावडे, जिजाऊ ब्रिगेडच्या अनिता काळे, नवनागापूरचे सरपंच डॉ. बबनराव डोंगरे, योगा ॲण्ड एरोबिकच्या डॉ. शिल्पा बालवे,  आदींसह विद्यार्थी, शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाहुण्यांचे स्वागत सुनिल काळाणे यांनी केले. प्रास्ताविकात हेमलता काळाणे म्हणाल्या की, कुशाग्र बुध्दीमत्तेसाठी दोन्ही मेंदू कार्यरत असणे आवश्‍यक असते. अबॅकसने बौद्धिक विकासाला चालना मिळून दोन्ही मेंदू कार्यरत होतात. यामुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढते. स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांसाठी अबॅकस व वैदिक मॅथ्स उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पंचवीस वर्षापासूनचा सामाजिक कार्यात झोकून देऊन उपेक्षितांसाठी उभे राहिलेल्या स्नेहालयाच्या विविध प्रकल्पांची माहिती देणारा लघुपट विद्यार्थी व पालकांना दाखविण्यात आला.
नगरसेविका दिपाली बारस्कर म्हणाल्या की, शिक्षणाबरोबरच मुलांमध्ये सामाजिक संवेदना जागरुक करण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून स्नेहालयात घेण्यात आलेली स्पर्धा कौतुकास्पद आहे. शिक्षण व संस्कारातून सशक्त पिढी घडणार आहे. समाजाचा पाया भक्कम करण्यासाठी सुसंस्कारी पिढीची गरज असून, या उद्देशाने ही स्पर्धी विद्यार्थ्यांच्या जीवनात स्फुर्ती देणारी ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अनिता काळे म्हणाल्या की, शिक्षण व संस्काराने घडलेली मुले जीवनात आपले ध्येय गाठतात. ज्ञानदान हे जगातील सर्व श्रेष्ठ दान असून, यामुळे संपूर्ण आयुष्याचे कल्याण होते. शिक्षक समाज घडवितात, त्याप्रमाणे मुलांच्या आईने देखील विद्यार्थ्यांवर जिजाऊंप्रमाणे शिवबासारखे संस्कार घडविण्याचे त्यांनी आवाहन केले.
स्नेहालयाचे अनिल गावडे म्हणाले की, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर गणित उपयोगी पडते. गणित हा दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असून, गणित सोपं करणारे साधन म्हणून अबॅकस विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त बनले आहे. ज्यांचे गणित चांगले झाले, त्यांच्या जीवनाचे गणित बिघडत नसल्याने सांगितले. तर स्नेहालयाच्या कार्याची त्यांनी माहिती दिली.
राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत विविध गटातून पतणे राजनंदिनी बसवेश्‍वर, बडे प्रथमेश शरद, जायभाय आर्या सुरेश, पवार साईकृष्ण राजेंद्र, लोहकरे उत्कर्ष सोमेश्‍वर, धापटकर आयुष राहुल यांनी चॅम्पियन्स ट्रॉफी पटकाविली. सर्व गटातील पहिल्या पाच क्रमांकाच्या विजेत्यांना आकर्षक ट्रॉफीसह बक्षीस देण्यात आले. तर सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांसह त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा देखील सन्मान करण्यात आला. स्पर्धेचे परीक्षण सविता काकडे, अश्‍विनी सादुल, दीपाली अदलिंगे व सना सय्यद यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋग्वेदी कदम व उज्वला मुरकुटे यांनी केले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अश्‍विनी मचे, स्वाती घुले, राधिका दहातोंडे, नम्रता गांगरडे, निकिता काकडे व युनिव्हर्सल अबॅकस असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.