१३०० विद्यार्थ्यांनी घेतली ‘बालविवाह’ न करण्याची शपथ!

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त स्नेहालय उडान प्रकल्पाच्या वतीने नेवासा तालुक्यातील चांदा येथील जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ‘माझी शाळा बालविवाह मुक्त शाळा’ अभियानांतर्गत विशेष जनजागृती कार्यक्रम पार पडला. यात १३०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी बालविवाह न करण्याची शपथ घेतली. या उपक्रमात ४० शिक्षक आणि गावातील ग्रामस्थ सहभागी झाले होते. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य जावळे होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून स्नेहालय उडान प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक प्रविण कदम यांनी उपस्थित 7 विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मार्गदर्शन केले. प्रवीण कदम यांनी विद्यार्थ्यांना बालविवाहामुळे होणारे शारीरिक, मानसिक, आणि सामाजिक परिणाम समजावून सांगत कायद्यांचे महत्त्व पटवून दिले.

वयात येणाऱ्या मुलांनी योग्य निर्णय घेण्यासाठी काय दक्षता घ्यावी आणि शिक्षणाच्या महत्त्वावर भर देत करिअर संदर्भात योग्य दिशा दाखवण्यात आली. स्नेहालय उडान प्रकल्पाच्या टीमने चाईल्डलाइन व स्नेहालयच्या उपक्रमांची माहिती दिली. स्नेहालय उडान प्रकल्पाने केवळ शाळेपुरता मर्यादित न राहता वाड्या-वस्त्यांपर्यं त जनजागृती पोहोचवण्याचा केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे. या उपक्रमामुळे समाजातील अनेक कुटुंबांना नवी दिशा मिळेल, असे प्राचार्य जावळे यांनी सांगितले. कार्यक्रमाची सांगता बालविवाहमुक्तीची प्रतिज्ञा घेऊन करण्यात आली. या यशस्वी कार्यक्रमासाठी प्रविण कदम, शाहिद शेख, पूजा दहातोंडे, सीमा जुनी आणि स्नेहालय उडान प्रकल्पाच्या टीमने परिश्रम घेतले.