नागापूर येथील रामराव चव्हाण माध्यमिक विद्यालयात बाल आनंद मेळावा उत्साहात
विद्यार्थ्यांनी गिरवले उद्योजकता आणि कौशल्य विकासाचे धडे
बाल आनंद मेळाव्यामुळे जीवन कसे जगावे हे समजते -उपनिरीक्षक देविदास भालेराव
नगर (प्रतिनिधी)- नागापूर येथील रामराव चव्हाण माध्यमिक विद्यालयात बाल आनंद मेळावा उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता आणि कौशल्य विकास होण्याच्या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आनंद लुटला. यावेळी मुलांनी भेळ, पॅटिस,पाणीपुरी, ढोकळा, इडली, मॅगी,तसेच शरीरासाठी पोषक असे पालेभाज्या, फळभाज्या, कडधान्ये व फळे, गृह उपयोगी वस्तूंचे स्टॉल थाटले होते.
या बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन एमआयडीसी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक देविदास भालेराव यांच्या हस्ते झाले. रेणुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भिमाजी कोकणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी रेणुका शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष सुरसिंगराव पवार, ह.भ.प. सदाशिव महाराज गीते, दिपालीताई बुगे, रेणुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव ज्ञानेश चव्हाण, संस्थेचे सहसचिव नितीन घाडगे, भाग्यश्री चव्हाण, विद्यालयाचे प्राचार्य शिवाजीराव घाडगे, पर्यवेक्षक दरेकर आदींसह प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, परिसरातील नागरिक, विद्यालयातील माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपनिरीक्षक देविदास भालेराव म्हणले की, विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहार ज्ञान आवश्यक आहे. जगात टिकायचे असेल तर आलेल्या संकटावर मात करुन पुढे जात रहावे व स्वतः मध्ये बदल करा. मोबाईल व टीव्ही मध्ये गुंतून न जाता मैदानी खेळ खेळा. आपल्याला आपले जीवन वाचवायचे असेल तर प्रत्येकाने शारीरिक व्यायाम केला पाहिजे. जंक फूड व फास्ट फूड खाणे टाळा, आणि पोषक आहार खाण्याचे त्यांनी आवाहन केले.
विद्यालयाचे प्राचार्य शिवाजीराव घाडगे यांनी शनिवारी (दि.18 जानेवारी) रोजी होणाऱ्या प्रा.डॉ. वसंत हंकारे यांच्या व्याख्यानमालेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले. या बालआनंद मेळाव्यात विविध साहित्याचे प्रदर्शन, समाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्या, आणि विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान होण्यासाठी विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते. यावेळी विविध उद्योगांवर आधारित प्रकल्प विद्यार्थ्यांनी सादर केले. बालआनंद मेळावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांसह पालकांनी गर्दी केली होती. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन रामभाऊ पोटे, जगदीश आव्हाड, संतोष उरमुडे, कैलास उमाप यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरोडे सर यांनी केले. प्राचार्य शिवाजीराव घाडगे यांनी आभार मानले.