राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार २०२४ जाहिर
अहिल्यानगर (प्रतिनिधी ) – सोळाव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलना निमित्ताने देण्यात येणारे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार ‘तळ हातावर उगवलेल्या कविता’, ‘निवडुंगाची काटे’. ‘साकव’,’तडजोड’ ‘गंपूच्या गोष्टी ‘इत्यादी पुस्तकांना जाहीर करण्यात येत असल्याची माहिती शब्दगंध चे उपाध्यक्ष माजी प्राचार्य जी.पी.ढाकणे व नियोजन समिती प्रमुख बबनराव गिरी यांनी दिली.
शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कार समितीची बैठक नुकतीच अध्यक्ष राजेंद्र उदागे,संस्थापक सचिव सुनील गोसावी,राज्य संघटक डॉ.अशोक कानडे, भगवान राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली,त्यावेळी हा निकाल जाहीर करण्यात आला.२०२४ च्या पुस्तकांचे परीक्षण प्रा.डॉ.संजय दवंगे,भाऊसाहेब सावंत,प्रा.डॉ.किशोर धनवटे,सुरेखा घोलप,शर्मिला गोसावी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले,त्यावेळी हा निकाल जाहीर करण्यात आला.
कादंबरी ‘तडजोड’ निवृत्ती जोरी,संभाजीनगर,कथासंग्रह ‘साकव’ संगीता पुराणिक,पुणे,काव्यसंग्रह ‘तळ हातावर उगवलेल्या कविता’ सुनील कोंडके व ‘दंगल होतेच कशी ?’ गौतम डोके,बडनेरा आत्मकथन ‘निवडुंगाची काटे’,जी.जी.कांबळे,लातूर,नाटक प्रभाकर दुपारे ‘समग्र नाटक प्रभाकर दुपारे’,नागपूर, व्यक्तिचित्रण ‘जिव्हाळ्याची माणसं’,भास्कर बंगाळे,पंढरपूर, ललित ‘ऑल इज वेल’ विनय मिरासे,यवतमाळ,संशोधन ग्रंथ ‘मराठी तेलगू भाषिक अनुबंध’ डॉ.दत्ताराम राठोड,अमरावती, बाल वाड:मय ‘गंपूच्या गोष्टी’ गौरव भुकन,केडगाव, प्रतिनिधीक काव्यसंग्रह ‘काव्यसंकल्प’ प्रा.हनुमान माने,बारामती, संकीर्ण ‘संत तुकाराम एक चिंतन’ प्रा.डॉ.सुभाष बागल,खुलदाबाद यांना जाहिर करण्यात येत आहे.
२०२४ चे जिल्हास्तरीय पुरस्कार काव्यसंग्रह वेदना, गोकुळ गायकवाड, जामखेड, देव माणसं, दिलीप सोनवणे संगमनेर यांना जाहीर करण्यात येत आहेत.
शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने नवोदित लेखक,कवींना प्रेरणा व प्रोत्साहन देण्यासाठी वर्षभर विविध साहित्यिक उपक्रम राबविण्यात येतात.त्यामध्ये कथाकथन,काव्यवाचन,परिसंवाद, चर्चासत्र,कथा-काव्य लेखन स्पर्धा,विविध पुरस्कार वितरण,पुस्तक प्रकाशन, बालसंस्कार शिबीर ई उपक्रम राबविण्यात येतात.त्यानंतर वर्षातून एकदा सर्व सभासदांना एकत्र भेटता यावे यासाठी राज्यस्तरीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात येते.
स्मृतिचिन्ह,सन्मानपत्र,शाल,बुके,पुस्तक भेट व साहित्य संमेलनात सहभाग असे पुरस्काराचे स्वरूप असून रविवार दिनांक ९ फेब्रुवारी २०२५ रोजी कोहिनूर मंगल कार्यालय,अहिल्यानगर येथे होणा-या सोळाव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनामध्ये पुरस्कार वितरण होणार आहे.