सामान्य कुटुंबातील तरुणाच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी इंदिराची निर्मिती : डॉ. तरिता शंकर

अहिल्यानगरमध्ये युथ यात्रा आणि लीडरशिप अवॉर्ड सोहळा

डॉ. तरिता शंकर, मकरंद अनासपुरे, निर्मिती सावंत
व शिक्षण तज्ञांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

अहिल्यानगर, ता १५ : सर्व सामान्यांना पडणारी स्वप्ने आणि धडपडया तरुणांची स्वप्न ही आपलीच स्वप्न आहेत. ती पूर्ण करणे ही आपली देखील जबाबदारी आहे अशा उदात्त भावनेतून टीम इंदिरा सतत तीस वर्षे झटते आहे. आतापर्यंत या संस्थेने हजारो विद्यार्थी घडविले. यापुढील काळातही विद्यार्थ्यांना केंद्र स्थानी ठेऊन इंदिरा विद्यापीठाची वाटचाल सुरु राहील. असे प्रतिपादन इंदिरा शिक्षण समुहाच्या अध्यक्षा व चीफ मेंटॉर डॉ. तरिता शंकर यांनी अहिल्यानगर येथे केले.
पिंपरी-चिंचवड (पुणे) येथील नामांकित इंदिरा शिक्षण समूहाचे इंदिरा विद्यापीठात रूपांतर होतं आहे. त्याअनुषंगाने अहिल्या नगर शहरातील विद्यार्थ्यांसाठी इंदिरा युथ यात्रा आणि लीडरशिप अवॉर्ड सोहळ्याचे आयोजन बुधवारी (ता. १५) करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. याप्रसंगी सिने अभिनेते मकरंद अनासपुरे, निर्मिती सावंत, इंदिराचे सीईओ डॉ. पंडित माळी उपस्थित होते. यावेळी अहिल्या नगर शहरातील विद्यार्थी, पालक, विविध शिक्षण संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रुष्टी मुनोत आणि समृद्धी ठुबे या माजी विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले
मकरंद अनासपुरे आणि निर्मिती सावंत यांच्याशी विद्यार्थी आणि पालकांनी मनसोक्त संवाद साधला. त्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरे देताना दोघांनीही कोपरखळ्या घेत उपस्थितांना खळखळून हसविले, शूटिंग दरम्यानचे किस्से, गंमती-जमती सांगतानाच संघर्षाच्या काळातील खाच-खळगे आणि हळवे कोपरे हळुवारपणे मांडले. यशाने हुरळून न जाता, अपयशाने खचूनही न जाता त्यातून बोध घेत जीवन जगायला शिका असा संदेश त्यांनी दिला. इंदिराचे सीईओ पंडित माळी यांनी प्रास्ताविकातुन इंदिराच्या कार्याचा आढावा घेताना जगभरातील विवीध देशांशी करार करून तेथील अनेक कोर्सेस इथे आणणार असल्याचे सांगितले. प्राचार्या डॉ. अंजली काळकर, रेणू गर्ग यांनी सूत्रसंचालन केले.