जेएसएस स्कूलच्या देव सत्रे याने महाराष्ट्र ओपन स्टेट तायक्वांदो स्पर्धेत पटकाविले कास्य पदक शाळेच्या वतीने सत्कार
विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणाबरोबरच खेळाकडे वळावे -आनंद कटारिया
नगर (प्रतिनिधी)- नुकतेच झालेल्या महाराष्ट्र ओपन स्टेट तायक्वांदो चॅम्पियनशिप स्पर्धेत जैनाचार्य श्री शिवमुनीजी गुरुकुल (जेएसएस) स्कूलचा विद्यार्थी देव किशोर सत्रे याने कास्यपदक पटकाविले. या विद्यार्थ्याचा शाळेत स्कूलचे प्राचार्य आनंद कटारिया यांनी सत्कार केला. याप्रसंगी शालेय शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आनंद कटारिया म्हणाले की, शाळेत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच विविध खेळाचे धडे देखील दिले जात आहे. शाळेचे रानवारा येथे नव्याने सुरु होत असलेल्या कॅम्पसमध्ये खेळाडूंच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे. शाळेतील खेळाडू विविध स्पर्धेत आपली गुणवत्ता सिध्द करत आहे. या क्रीडा संकुलच्या माध्यमातून खेळाडूंना चालना मिळणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये दिवसेंदिवस मैदानी खेळाचे महत्त्व कमी होत चालले आहे. विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणाबरोबरच खेळाकडे वळावे, यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याच कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
वाडियापार्क क्रीडा संकुल येथे महाराष्ट्र ओपन स्टेट तायक्वांदो स्पर्धा उत्साहात पार पडली. यामध्ये मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. देव सत्रे याला सचिन मरकड व शाळेचे क्रीडा शिक्षिका आरती राऊत यांचे मार्गदर्शन लाभले.