पीडित कर्मचाऱ्यांनी मागीतली स्वेच्छा मरणाची परवानगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांचा न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार
पीडित कर्मचाऱ्यांनी मागीतली स्वेच्छा मरणाची परवानगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांचा न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार
अहमदनगर :
नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात आपला जीव धोक्यात घालून जनतेची सेवा केली . मात्र आता याच कर्मचाऱ्यांना बेघर करण्याचा घाट घातला जातो आहे. हा आदेश न पाळणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांनी बेकायदेशीर पणे रोखले . त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना निवेदन देऊन स्वेच्छा मरणाची परवानगी मागितली आहे. यासंदर्भात शिवसेना उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव यांना माहिती मिळाल्यानंतर जाधव यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या . जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनिल पोखरणा हे जाणूनबुजून कर्मचाऱ्यांवर अन्याय करीत असून या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण पुढाकार घेऊन पाठपुरावा करू असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच त्यांच्यासोबत स्वतः जिल्हा रुग्णालयात जाऊन तक्रार दिली . लवकरच ते याचा जाब जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनिल पोखरणा यांना विचारणार आहेत तसेच या कर्मचाऱ्यांवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर प्रयत्न करणार आहेत.
नगरचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा हेजेव्हा निवासी जिल्हा शल्य चिकित्सक पदावर कार्यरत होते . त्यावेळी त्यांनी या रुग्नालयातील आजारी परिचारिका शैलजा साळवे यांना सूडबुद्धीने रजा नाकारली होती . त्यामुळे साळवे यांचा उपचारा अभावी जिल्हा सामान्य रुग्णालयातच दुर्दैवी मृत्यू झाला होता. साळवे यांच्या मृत्यूला डॉ पोखरणा हेच जबाबदार असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी झाली होती . यासाठी जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्यावेळी काम बंद करून आंदोलन देखील केले होते. या आंदोलनात कर्मचारी राजेश ढवण , गणेश परदेशी , शाम जाधव , रावसाहेब आव्हाड आदींचा सहभाग होता . हे पोखरणा यांनी पुरते ध्यानात ठेवले . आता त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक पदाचा पदभार स्वीकारला त्यावेळी त्यांनी लगेच या आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यावर सूड उगविण्याचे प्रकार सुरु केले आहेत. त्यामुळे वर्षानुवर्षे जुने सिव्हिल हॉस्पिटल परिसरात शासकीय निवास्थानांत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही निवास्थाने तात्काळ रिक्त करण्याचे आदेश दिले . वास्तविक या निवास्थानात हे कर्मचारी रीतसर भाडे भरून रहात आहेत . तसेच या निवास्थानांची डागडुजी त्यांनी स्वतःच्या पैशातून केली आहे. मात्र ही निवास्थाने रिक्त करण्याचा आदेश न पाळणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार थांबविण्याचे आदेश त्यांनी दिले. यामुळे त्यांच्यावर उपासमारीची आणि अनाठायी बेघर होण्याची वेळ आली आहे .
या अन्यायाविरोधात हे कर्मचारी काहीच करू शकत नसल्याने त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकाकडे स्वेच्छा मरणास परवानगी देण्यासाठी अर्ज केला आहे. तुमच्या विरोधात आंदोलन केल्याचा पूर्व राग मनात धरून केव्हीकल सूड बुद्धीने आमची राहती निवास्थाने रिक्त करण्याचा आदेश तुम्ही पारित केलेला आहे . हा आदेश आमच्यावर व आमच्या कुटुंबियांवर अन्याय करणारा आहे. शासकीय कर्मचारी असल्याने या विरुद्ध आम्ही काहीच करू शकत नाही असे समजून आपण आम्हाला बेघर करण्याच्या उद्देशाने सदर आदेश पारित केलेला आहे. कोविड १९ च्या जागतिक महामारीच्या काळात आम्ही व आमच्या कुटुंबीयांनी आपला जीव धोक्यात घालून रुग्णसेवा केली व नागरिकांचे प्राण वाचवले . तरीदेखील आपण आम्हाला बेघर करून व आमचे मासिक वेतन थांबवून आम्हाला उपाशीपोटी मरणाच्या दारापाशी सोडणारा आदेश देत आहात हे अन्याय कारक आहे. आमच्यापुढे जगण्याचा कोणताच आसरा शिल्लक राहिलेला नसल्यामुळे आपण आम्हाला स्वेच्छा मरणाची कायदेशीर परवानगी द्यावी असा विनंती अर्ज या कर्मचाऱ्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकाकडे केला आहे.
या तक्रारीविषयी शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव याना समजले असता त्यांनी याबाबत आपण डॉ . पोखरणा यांना जाब विचारू आणि कर्मचाऱ्यांवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.