जिल्हा परिषद शाळेतून शिकलेला चैतन्य होणार डॉक्टर

नीट परीक्षेत यश संपादन करुन वैद्यकिय प्रवेशास पात्र

अहमदनगर (प्रतिनिधी)- नुकताच राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षेचा (नीट) निकाल जाहीर झाला. वडगाव सावताळ (ता. पारनेर) येथील तरटीफाटा जिल्हा परिषद शाळेत शिक्षण झालेल्या चैतन्य बाबासाहेब शिंदे याने 625 गुण मिळवत उज्वल यश संपादन केले. तो वैद्यकिय प्रवेशास पात्र झाल्याबद्दल जिल्हा परिषदेत माजी विद्यार्थी असलेल्या चैतन्याचा गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला.
शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्याध्यापक विश्‍वास नेव्हे, शिक्षक विशाल पाचारणे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अजय खोडदे, भाऊसाहेब महाराज शिंदे, जगन्नाथ रोकडे, धनजंय शिंदे, संकल्प शिंदे, बाबासाहेब साळुंके, रावसाहेब जाधव, संदीप जाधव, गणेश शिंदे, विवेक शिंदे, संतोष शिंदे, सुनिल शिंदे, माजी सरपंच बाबासाहेब शिंदे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाऊसाहेब महाराज शिंदे म्हणाले की, शाळेच्या भौतिक सुविधांपेक्षा शाळेची गुणवत्ता महत्त्वाची ठरते. पालकांनी शाळेच्या गुणवत्तेकडे लक्ष देण्याची गरज आहे. जिल्हा परिषदेतही गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळते, यावरुन सिध्द होत असल्याचे सांगितले.
चैतन्य शिंदे यांनी जिल्हा परिषदेच्या शालेय विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षाचे महत्त्व व त्याची माहिती देऊन त्याच्या अभ्यासाबद्दल मार्गदर्शन केले. तर या यशात प्राथमिक शिक्षकांचा मोलाचा वाटा असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक विशाल पाचारणे यांनी केले. आभार मुख्याध्यापक विश्‍वास नेव्हे यांनी मानले.