अहमदनगर:केडगाव येथील लक्ष्मी कृपा गृहनिर्माण सोसायटीच्या मालकीचा प्लॉट क्रमांक 43 ची परस्पर विक्री करत संस्थेला चार लाखांचा चुना लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तत्कालीन तालुका उपनिबंधक कार्यालयातील शासकीय परिरक्षकासह खरेदीदार विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गृहनिर्माण सोसायटीचे परीरक्षक आर.बी. साळवे आणि प्लॉट खरेदीदार सकलेन शाकीर शेख असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत प्रमोद कुलकर्णी यांनी फिर्याद दिली आहे ते 1983 पासून सोसायटीचे सभासद आहे. त्यांच्या सोसायटीत एकूण 42 प्लॉट धारक असून 43 क्रमांकाचा प्लॉट सोसायटीच्या नावे होता. या भूखंडावर समाज मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला बांधकाम परवानगीसाठी संस्थेने प्रस्तावही सादर केला. त्यासाठी जागेचा उतारा आवश्यक होता. तो आणण्यासाठी कुलकर्णी केडगाव येथील तलाठी कार्यालयात गेले, तेव्हा त्यांना सदरचा भूखंड शेख यांच्या नावावर असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ते सामाजिक कार्यकर्ते निलेश बांगरे यांच्यासह नगर तालुका उपनिबंधक कार्यालयात गेले. त्यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागवली. त्यात जुलै 2022 मध्ये सोसायटीचे परिरक्षक म्हणून साळवे यांची नेमणूक करण्यात आली होती. सदरच्या भूखंडाची बाजारभावाप्रमाणे विक्री करून रक्कम सरप्लस खाते भरण्याचा आदेश देण्यात आला.