महापालिकेचा नगररचना विभाग पुन्हा चर्चेत

बच्चू कडू यांचा विधानसभेत प्रश्न

महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे आणि त्यांच्या स्वीय सहाय्यक श्रीधर देशपांडे यांच्यावर लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर मनपाचा नगररचना विभाग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याप्रकरणी आमदार बच्चू कडू यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला आहे. नगररचना विभागातील अधिकाऱ्यांकडून बांधकाम परवानगीसाठी मोठमोठ्या रकमा घेतल्या जातात. कोणत्या बांधकामासाठी किती रक्कम? याच्या सुरस काही बांधकाम व्यवसायिकांकडून सांगितल्या जात आहे. मनपाच्या नगरारचना विभागातील काही अधिकारी, कर्मचारी बांधकाम परवानग्यांसाठी बांधकाम व्यवसायिकांसह सर्वसामान्य नागरिकांकडूनही पैसे घेत असल्याचे आरोप मनपाच्या महासभेत नगरसेवकांनी अनेक वेळा केले. याबाबत मात्र थेट पुरावे कोणी सादर केले नाही. तसेच लेखी तक्रारही कोणी करत नव्हते. त्यामुळे या आरोपांवर कायदेशीर कार्यवाही झाली नाही. आता थेट आयुक्तांवरच पैसे मागितल्याचा आरोप झाला आहे. त्यामुळे शहरात सुरू असलेल्या मोठमोठ्या बांधकाम प्रकल्पांबाबतही चर्चा सुरू झाल्या आहेत. शहरात नगर-मनमाड रोडवर बांधण्यात आलेल्या एका मोठ्या इमारतीचा बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेताना, सदर बांधकाम व्यावसायिकाने बनावट कागदपत्रे सादर करून मनपाची पाच कोटींची फसवणूक केल्याचे प्रकरण सध्या गाजत आहे. या विषयात मनपाच्या अधिकाऱ्यांवरही आरोप होत आहे. आता या प्रकरणात पुढे काय होणार हे पाहणे अधिक महत्त्वाचे ठरणार आहे.