दुधाला प्रति लिटर 35 रुपये : विखे पाटील
आंतरराष्ट्रीय बाजारात दूध आणि बटरचे दर कमी झाल्याने राज्यातील दूध खरेदी दरावर परिणाम झाला होता.त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी दुधाला प्रतिलिटर 30 रुपये स्थायी भाव आणि सरकारकडून पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. दुधाचे नवीन दर १ जुलैपासून लागू होणार आहेत. याबाबतचे निवेदन पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत केले विखे म्हणाले राज्यभरातील सहकार्य तथा खाजगी दूध उत्पादक संघ आणि दूध उत्पादक शेतकरी यांची तातडीने बैठक घेऊन उत्पादक शेतकरी आणि दूध संघाच्या समस्या जाणून घेतल्या. राज्यातील सर्व खाजगी तथा सहकारी दूध संघाने शेतकऱ्यांना प्रति लिटर 30 रुपये भाव देण्याचे सर्वानुमते ठरले. तसेच पाच रुपये प्रति लिटरचे अनुदान, दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात सरकार वर्ग करेल. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति लिटर 35 रुपये दर मिळेल. आंतरराष्ट्रीय बाजारात दूध आणि बटरची मागणी कमी झाल्याने दर घसरत आहे. जे दूध प्रकल्प भुकटी निर्यात करतात, त्यांना प्रोत्साहन म्हणून प्रतिकिलो साठी 30 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. अनुदानाची ही मर्यादा 150 हजार टणांसाठी असेल.