वैष्णवांचा मेळा शहरात विसावला

संत निळोबारायांच्या दिंडी सोहळ्याचे प्रस्थान अण्णा हजारे यांच्या हस्ते विधिवत पूजा संपन्न

….एकोबा, तुकोबा, निळोबाच्या नामक टाळ मृदुंगांचे गजरात, ताशांच्या सुरात, हाती भगवे झेंडे घेऊन, दंग झालेल्या वारकऱ्यांच्या साक्षीने निळोबाराय महाराजांच्या दिंडी सोहळ्याचे मंगळवारी पारनेर तालुक्यातल्या श्री क्षेत्र पिंपळनेर इथून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले. याप्रसंगी बोलताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले, संतांचे आपल्यावर मोठे उपकार आहे, संत शिकवणीमुळे आपली संस्कृती टिकून आहे. संत संगतीमुळे मनुष्य जीवनाचे कल्याण होते. निळोबारायांच्या रथाला सिद्धेश्वर वाडी व पुणेवाडी दिंडीच्या वतीने नगरा आणि बैलगाडी भेट देण्यात आली तर रथासाठी संतोष काटे यांनी बैलजोडी दिली होती. यावेळी पारनेरचे तहसीलदार, निळोबाराय देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष, पालखी सोहळा प्रमुख, सरपंच, उपसरपंच, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य, यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.