महिलांचा, लाडकी बहीण योजनेसाठी वय कमी करण्यावर भर

आता एसटीचा मोफत प्रवास नको

खेडगाव : राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसमध्ये महाराष्ट्रभर सवलतीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करण्याची संधी आहे. त्यामुळे अनेक महिलांनी आधारवर स्वतःचे वय वाढवले होते. मात्र आता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी 65 वर्षांची अट ठेवली आहे. त्यामुळे आधार कार्डवर पुन्हा वय कमी करण्यासाठी महिलांची सीएससी सेंटरवर गर्दी वाढली आहे. यात काही महिलांनी एसटीच्या प्रवासाचा फायदा घेण्यासाठी बनावट आधारकार्ड बनवले. त्यामुळ प्रवास करताना बनावट तरलाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी ओरिजनल आधार कार्ड वापरणार आहेत.
नगरमध्ये जेष्ठ महिलांची मोठी संख्या
नगरमध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसमध्ये मोफत प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ महिलांची संख्या मोठी आहे. आता प्रवासापेक्षा लाडकी बहिण योजनेचा लाभ घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे अनेक महिला आपल्या आधारकार्ड वरील वय कमी करण्यासाठी गर्दी करत आहे. राज्य शासनाने लाडकी बहिण योजनेची घोषणा केल्यानंतर नगर शहर व तालुक्यातील सर्वच सीएससी सेंटरवर वय कमी करण्यासाठी महिलांची गर्दी दिसून येत आहे. काही ठिकाणी तर रांगा लागत असल्याचे दिसून येते. आधार कार्ड अपडेट करण्यासाठी किमान 21 दिवसांचा कालावधी लागत आहे. भविष्यात येणाऱ्या अनेक लाभांसाठी या प्रकारचे अनेक गंभीर उपाय लाभार्थ्यांकडून योजले जात आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने ज्यांना या योजनांचा लाभ मिळण्याची गरज आहे. ते मात्र अशा योजनांपासून काही प्रमाणात दूर राहिल्याचे दिसते. याची शासनाने कठोरपणे आणि गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे.