सर्वसामान्यांच्या व्याधी मुक्तीसाठी रुग्णसेवेच्या आरोग्य मंदिरात सेवा करण्याचे भाग्य मिळाले -सुमतीलाल गांधी
आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये मोफत कॅन्सर तपासणी शिबिराला प्रतिसाद
विविध प्रकारच्या थेरपी व उपचार केल्या जाणार अल्पदरात
नगर (प्रतिनिधी)- व्याधीने ग्रासलेल्या दीन-दुबळ्या रुग्णांसाठी आनंदऋषीजी हॉस्पिटल आधार ठरत आहे. हॉस्पिटलच्या माध्यमातून सर्वसामान्यांना नवजीवन देण्याचे कार्य सुरु आहे. सर्वसामान्यांच्या व्याधी मुक्तीसाठी रुग्णसेवेच्या आरोग्य मंदिरात सेवा करण्याचे भाग्य मिळाल्याची भावना सुमतीलाल गांधी यांनी व्यक्त केली.
जैन सोशल फेडरेशन संचलित श्री आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये सुमतीलाल गांधी व गांधी परिवार (पवन फर्टीलायझर्स, सीड्सवाला, टाकलीवाला) यांच्या वतीने आयोजित मोफत कॅन्सर तपासणी शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी सुमतीलाल गांधी बोलत होते. याप्रसंगी ऋषभ गांधी, पवन गांधी, सुरेश छल्लाणी, चंदना गांधी, निशा गांधी, तनिष्का गांधी, शरयू गांधी, सानिया गांधी, आदित्य गांधी, संतोष बोथरा, सीए आयपी अजय मुथा, डॉ. प्रकाश कांकरिया, डॉ. वसंत कटारिया, सतीश लोढा, अभय गुगळे, मानकचंद कटारिया, प्रकाश छल्लाणी, सुरेश कटारिया, सुभाष मुनोत, वसंत चोपडा आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात संतोष बोथरा म्हणाले की, हॉस्पिटलच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त वाटचाल करत असताना एकाच छताखाली सर्व आरोग्य सुविधा मिळण्यासाठी कार्य सुरु आहे. समाजात कॅन्सरचे प्रमाण वाढत असताना, या गंभीर आजाराचे धोके टाळण्यासाठी सहा महिन्यांपूर्वी ही सेवा हॉस्पिटलमध्ये कार्यान्वीत करण्यात आली. कॅन्सरची महागडी उपचार पध्दती व औषधोपचार सर्वसामान्यांना अल्पदरात हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करुन देण्यात आले आहे. शेवटच्या घटकांपर्यंत आरोग्य सेवा पोहचवली जात आहे. सद्भावनेने सुरु असलेल्या आरोग्य मंदिरात दवा बरोबर दुवा देखील मिळत आहे. आलेला रुग्ण चांगला होवून परत जात असल्याचे स्पष्ट केले. तर वर्धमान महावीर युनिव्हर्सिटी शैक्षणिक प्रकल्पाच्या माध्यमातून जून पासून बीएसई नर्सिंग व ऑपटोमेटरी कॉलेज सुरु होणार आहे. तर लवकरच इंग्रजी मीडियम स्कूल देखील कार्यान्वीत होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून अद्यावत ज्ञान संकुल उभे राहत असून, ते भविष्यातील सक्षम पिढी घडविण्यासाठी कार्य करणार असल्याचे सांगितले.
डॉ. अनिकेत शिंदे म्हणाले की, कॅन्सर झाले म्हणजे मनुष्याचे जीवन संपत नाही, कॅन्सर हा पूर्णत: बरा होतो. त्याचे वेळेवर निदान व योग्य उपचार होणे आवश्यक आहे. यासाठी नागरिकांनी जागृक राहण्याची गरज आहे. हॉस्पिटलमध्ये कॅन्सर रुग्णांसाठी केमोथेरपी व रेडिएशनची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. हा विभाग सुसज्ज आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून सेवा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सीए आयपी अजय मुथा म्हणाले की, पवन फर्टीलायझर्सच्या माध्यमातून गांधी परिवाराने देशात नाव कमावले आहे. संपूर्ण देशभर त्यांचा व्यवसाय सुरु असून, सामाजिक भावनेने त्यांचे सातत्याने कार्य सुरु आहे. या आरोग्याच्या सेवा कार्यात त्यांनी लावलेला हातभार प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
ऋषभ गांधी म्हणाले की, आनंदऋषीजींच्या विचाराने गांधी परिवार सेवा कार्यात योगदान देत आहे. या सेवा कार्यात सहभागी होवून वेगळा आनंद मिळत आहे. आनंदऋषीजी म.सा. यांच्या 28 मार्च या स्मृतीदिनानिमित्त पवन फर्टीलायझरची मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती. त्यांच्या आशिर्वादाने हा व्यवसाय देशभर पसरला असून, या माध्यमातून सेवा कार्य देखील सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
या शिबीरात 55 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. गरजेनुसार रुग्णांवर विविध प्रकारच्या थेरपी व उपचार अल्पदरात केल्या जाणार आहेत. आभार प्रकाश छल्लाणी यांनी मानले.