अहमदनगर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी शिबिराचे उद्घाटन उत्साहात संपन्न
अहिल्यानगर : अहमदनगर महाविद्यालयच्या राष्ट्रीय सेवा योजना एन.एस.एस. विभागाच्या वतीने घोसपुरी येथे विशेष हिवाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन सरपंच किरण साळवे व पंचायत समिती माजी सभापती अशोकराव झरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
युथ फॉर माय भारत आणि डिजिटल साक्षरता या संकल्पनेवर आधारित या शिबिरात ग्रामविकास व समाजप्रबोधनासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. शिबिरात सहभागी झालेले विद्यार्थी आणि प्राध्यापक मिळून ग्राम स्वच्छता, प्लास्टिक मुक्त गाव, झाडांना रंग देणे तसेच, बालविवाह रोखण्यासाठी समाजप्रबोधन, किशोरवयीन मुला-मुलींची अनेमिया तपासणी आणि लिंगभाव संवेदनशीलतेसाठी जाणीव जागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे.
याशिवाय, नदी व जलस्रोत स्वच्छता, वृक्षारोपण, पर्यावरण व जैवविविधता संवर्धन, मृदा संरक्षण, लोकशाहीतील सहभाग वाढवण्यासाठी मतदार जनजागृती, आणि इतर महत्त्वाचे उपक्रम राबवले जात आहेत.
या शिबिराचे संपूर्ण नियोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दिलीपकुमार भालसिंग, डॉ. रज्जाक सय्यद (समन्वयक विनाअनुदानित विभाग), उपप्राचार्य डॉ. प्रीतमकुमार बेदरकर, उपप्राचार्य डॉ. नोएल पारगे, श्री. पीटर चक्रनारायण (प्रभारी प्रबंधक) आदींचे सहकार्य लाभले.
हे विशेष हिवाळी शिबार यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. पोपट सिनारे, डॉ. रविंद्र मते, डॉ. प्रबंधिका शेलार तसेच डॉ. सचिन मोरे, डॉ. भागवत परकाळ, प्रा. श्रद्धा कांबळे, प्रा. पुष्कर बिबवे, प्रा. सचिन बोरुडे आणि डॉ. सीमा तिकोने आदींचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. या शिबिरामध्ये 100 विद्यार्थी सहभागी झाले असून त्यापैकी 55 विद्यार्थिनी व 45 विद्यार्थी आहेत.
——–