८ हजारांचे मोजमाप पूर्ण, बोगस नळजोडनी उघड
नोंदणीकृत मालमत्ता - 1 लाख 31 हजार मोजणी झालेल्या मलमत्ता - 8000 मोकळ्या जागा - 15 हजार
अहमदनगर – शहरातील महापालिकेने उत्पन्न वाढीसाठी मालमत्तांच्या मोजणीचे काम हाती घेतले आहे. आतापर्यंत शहर आणि सावेडी विभागातील ८ हजार मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असुन, त्यात अनेक बोगस मालमत्ता महानगरपालिकेच्या राडारावर आले आहेत. शहरातील सुमारे १ लाख ३१ हजार इमारती, घरे व भूखंडाचे जीआयएस मॅपिंग द्वारे मोजमाप करण्यात येणार आहे. हे काम युद्ध पातळीवर सुरु असुन, दिल्ली येथील मॅप माय इंडिया या कंपनीला हे काम देण्यात आले आहे. शहरात नव्या इमारती उभ्या राहत आहेत. परंतु हजारो मालमत्तांची आजही महापालिकेच्या दप्तरी नोंद नाही. तसेच बहुतांशी मालमत्तांचा व्यापार व्यवसायासाठी सुरू आहे. परंतु त्यांची नोंद मात्र घरगुती वापरासाठी करण्यात आलेली आहे. त्यात या मालमत्तांना जुन्याच पद्धतीने कर लावला जातो. त्यामुळे महापालिकेचा कोट्यावधी रुपयांचा कर बुडत असुन, कर आकारणीचे फेर मूल्यांकन करणे, तसेच बोगस मालमत्तांचा शोध घेण्याच्या उद्देशाने शहरातील सर्व मालमत्तांचे मोजमाप करण्यात येणार आहे. इमारती, घरे, मोकळ्या जागा, ओढे – नाले तसेच इतर मालमत्तांचे जीआयएस मॅपिंग द्वारे सर्वेक्षण करून त्या माहितीचे संगणकीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर या सर्वेक्षणानुसार कर आकारण्यात येणार आहे. घरगुती व्यावसायिक मालमत्ता, बोगस मालमत्ता तसेच अधिकृत नळजोड असलेल्या मालमत्तांची स्वतंत्र नोंद या सर्वेक्षणाद्वारे करण्यात येत आहे. तसेच शहरातील सर्व मालमत्तांचे संगणकीकरण करण्यात येणार आहे. जीआयएस मॅपिंग द्वारे घेण्यात आलेले मालमत्तांचे मोजमाप, बांधकामाचे नकाशे, बांधकामाचे छायाचित्र अशी सर्व माहिती नव्याने विकसित केलेल्या सॉफ्टवेअर मध्ये एकत्रित केली जाणार आहे. ही सर्व माहिती एकत्रित करून सुधारित पद्धतीने कर आकारणी होणार आहे. शहरातील मालमत्तांसह नळजोडांचेही सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यामुळे बोगस नळजोड घेणारे ही महापालिकेच्या राडारावर येत आहेत. मालमत्ता धारकाचे नाव, त्याच्याकडे असलेला नळजोड, त्याची येणारी पाणीपट्टी, अशी सर्व माहिती संकलित केली जात आहे. तसेच खाजगी कंपनीचे ६० ते ७० कर्मचारी घरोघरी जाऊन मालमत्तांची मोजणी करत असुन, अनेक नागरिक या कर्मचाऱ्यांना घरात प्रवेश करू देत नाहीत. तर काहीजण जास्तीची व्यावसायिक कर आकारणी टाळण्यासाठी आपल्या घरातील भाडेकरुंची लपवाछपवी करत आहेत. त्यामुळे सर्वेक्षणात अडचणी येत असल्याने खाजगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे म्हणने आहे.