न्याय! न्याय देता का न्याय? या एकांकिकेने पालकांचे उघडळे डोळे
अपेक्षांचे ओझे लादणाऱ्या पालकांनाच मुलांनी खेचले न्यायालयात
राज्य बालनाट्य स्पर्धेत लक्ष्मीभाऊराव पाटीलच्या विद्यार्थ्यांनी घडवले वास्तवतेचे दर्शन
नगर (प्रतिनिधी)- मुलांना व्हायचे पॉप सिंगर, क्रिकेटर, चित्रकार मात्र त्यांच्यावर पालकांकडून लादले जातात डॉक्टर, इंजिनियर व्हायचे स्वप्न. पालकांचे हे स्वप्न पूर्ण करताना विद्यार्थ्यांचे उध्वस्त होणारे जीवन, घुसमट व बंधनांची जाणीव करुन देण्यासाठी लक्ष्मीभाऊराव पाटील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी शासनाच्या 21 व्या राज्य बालनाट्य स्पर्धेत न्याय! न्याय देता का न्याय? ही एकांकिका सादर केली. अपेक्षांच्या ओझ्यापायी बालकांचे बालपण हिरावून त्यांच्या जीवनाशी खेळले जात असल्याचा समाजातील गंभीर प्रश्न यावेळी मांडण्यात आला.
या नाटकात थेट पालकांना न्यायालयात खेचण्यात आले. तर पालकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करुन मुलांनी स्वतळ्च्या जीवनाशी सुरु असलेल्या खेळाचा जाब विचारला. स्पर्धामय युगात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या या नाटकांने प्रेक्षकांची मने जिंकली. तर उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात बालकलाकारांना दाद दिली.
वादी प्रतिवादी हाजीर हो…. हाक देऊन पालक व विद्यार्थी न्यायालयात दाखल झाले होते. मुलांनी जन्मदात्यापासून अन्यायमुक्त करा, आंम्हाला खेळायचे, पळायचे, उंच उडायची आर्तहाक देत, पालकांनी लादलेल्या बंधनातून मुक्त होण्यासाठी स्वातंत्र्याची भीक मागितली. मम्मीकडून अबॅकस, छंद वर्ग, निबंध, वक्तृत्व स्पर्धा, शिष्यवृत्ती परीक्षेसाठी गुंतवून ठेवण्यात आले आहे. मुलांना काय आवडेल व काय झेपेल? याचा विचार केला जात नाही. वारंवार शाळा बदलणे, माध्यम बदलणे यामुळे मुलांना येणाऱ्या अडचणी नसल्याची बाजू न्यायधीशासमोर मुलांनी मांडली. डॉक्टराच्या मुलाला क्रिकेटर व्हायचे, पण डॉक्टर पालकाकडून शिक्षणासाठी त्याच्यावर दबाव आणला जात असताना, तो मुलगा देखील आपल्या पालकांना न्यायालयात खेचतो या प्रसंगाने लक्ष वेधले.
पालकांनी भविष्यातील स्वप्न रंगवून घाण्याच्या बैलासारखी जुंपवलेले मुले, शैक्षणिक दबाव आणून त्यांच्यावर सुरु असलेला अन्याय नाटकातून मांडण्यात आला. न्यायधीशांनी बालमानसशास्त्रचा विचार करून मुलांच्या अपेक्षा व आवड-निवड करण्याचा आदेश पालकांना केला. तर पालकांना देखील आपली चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी मुलांसमोर दिलगीरी व्यक्त केली. शहरापासून ते शेतकरी वर्गापर्यंतचा हा प्रश्न मांडण्यात आला अपेक्षांच्या ओझ्यांनी काही मुले मनोरुग्ण झाल्याची दाहकता दाखवण्यात आली.
शुभांगी या इयत्ता नववीच्या मुलीने शैक्षणिक व मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित केला. यावर न्यायधीशांनी प्रस्थापितांना खडेबोल सुनावत या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याचे आदेश दिले. उद्योगपती नाही तर न्यायपती व्हायचे होते? या ध्येयाने न्यायधीश झालेल्या मुलाला त्याचे बाबांची झालेली भेटीने नाटकाचा समारोप करण्यात आला. मुलांवर अपेक्षांचे ओझे न लादता त्यांच्यातील कलागुण ओळखून त्यांना प्रोत्साहन देण्याचे व प्रेमाने आधार देण्याचा संदेश या नाटिकेतून देण्यात आला.
या नाटिकेचे निर्माते ज्ञानदेव पांडुळे, लेखक काकासाहेब वाळुंजकर, दिग्दर्शक शिवाजी लंके आहेत. नाटकाला संगीत कल्पेश शिंदे, रंगभूषा व वेशभूषा सुजाता दोमल, नेपथ्य संतोष कदम, प्रकाश योजनेचे काम श्याम शिंदे यांनी पाहिले. तर शौर्य येठेकर, शिवांश कर्डिले, समरप्रताप कवडे, सिद्धवेदाय पेंडभाजे, स्वरा पवार, श्रीराज गोल्हार, शिवराज खुडे, पार्थ जाधव, हर्ष रांधवन, आस्था सुंबे, कपिश टकले, विश्वजीत शिंदे, गौरी कोतकर, शौर्य काळभोर, रुद्र गुंजाळ, आरव झरेकर, आरुषी बनकर, शंभू रणसिंग, हर्षवर्धन धुमाळ, ईश्वरी ढगे, साई तांबडे या विद्यार्थ्यांनी विविध पात्र साकारले. नाटिका सादर करण्यासाठी भाग्यश्री लोंढे, उर्मिला साळुंके, मीनाक्षी खोडदे, अमित धामणे, प्रदीप पालवे आदींनी परिश्रम घेतले.