पर्यटनस्थळी सुरक्षेची सर्व व्यवस्था करा
मुख्यमंत्री : एकनाथ शिंदे यांचे प्रशासनाला आदेश
लोणावळ्यातील भुशी धरण दुर्घटनेची गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून, राज्यातील पर्यटनस्थळी सुरक्षेच्या सर्व व्यवस्था करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. भुशी धरणावर पर्यटनासाठी आलेले एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले. या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सूचनानुसार सर्व जिल्हाधिकारी आपापल्या जिल्ह्यातील धोकादायक पर्यटन स्थळांचा आढावा घेणार आहे. पावसाळी पर्यटन सुरक्षित होणे गरजेचे असून त्यासाठी सर्व धोकादायक स्थळांवर सूचना फलक लावण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. याबरोबरच अशा ठिकाणी जीवरक्षक तैनात करा, रुग्णवाहिका ठेवा, एसडीआरएफ ची टीम त्या ठिकाणी तैनात करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिका आयुक्तांनाही सूचना केल्या आहे.पर्यटनाचा आनंद घ्या, पण आपल्या प्रियजनांचा अनमोल जीव धोक्यात घालू नका, धोक्याच्या इशारांकडे दुर्लक्ष करू नका असे आवाहनही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले आहे.