भावाच्या अंत्यविधीचा खर्च मागत, दिराने केली दोन भावजयींची हत्या
हत्येनंतर आरोपी फरार ; सी सी टी व्ही. त आरोपी कैद
भावाच्या अंत्यविधीला झालेला खर्च मागितल्यावरुन झालेल्या वादातून दिराने भावजयीवर कोयत्याने वार केल्याची घटना कालअकोल्यात घडली . भावजयीला वाचवण्यासाठी आलेल्या दुसऱ्या भावजयीवरही त्याने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात दोघी जावा ठार झाल्या, त्यांचा खून केल्यानंतर आरोपी हातात कोयता घेऊन ग्रामस्थांसमोर निघून गेला. त्याचा अवतार पाहून कोणीही त्याला अडवण्याची हिंमत केली नाही.हे रक्तरंजित हत्याकांड तालुक्यातील बेलापूर इथे सोमवारी दुपारी घडले . उज्वला अशोक फापाळे (वय ३५) व वैशाली संदीप फापाळे (वय ४५) ही ठार झालेल्या जावाची नावे आहेत. त्यांचा दीर दत्तात्रय उर्फ बापू प्रकाश फापाळे (वय ४५) हा फरार झाला. पोलिसांनी दिलेच्या प्राथमिक माहितीनुसार दत्तात्रयचा भाऊ अशोक याचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्याच्या अंत्यविधीचा खर्च दत्तात्रय – भावजयीकडे मागत होता.कौटुंबिक वादामुळे उज्वला फापाळे मुलांसह काही दिवस माहेरी निघून गेली होती. मात्र, सोयाबीनच्या काढणीसाठी ती पुन्हा बेलापुरात आली. दत्तात्रयने तिच्याकडे पुन्हा पैशांची मागणी केली, त्यावर तिने माझे पती तुमचेही भाऊ होते, माझ्याकडे आता तुम्हाला देण्यासाठी पैसे नाहीत, असे उज्वलाने सांगितले. त्याचा राग आल्याने दत्तात्रयने तिच्यावर कोयत्याने हल्ला केला. तिला वाचवण्यासाठी मध्ये आलेल्या वैशाली यांच्यावरही त्याने वार केले. घटनेनंतर दत्तात्रय रक्ताने माखलेला कोयता हातात घेऊन पायी चालत निघून गेला. त्याला काही लोकांनी पाहिले, तरी ते त्याला अडवू शकले नाहीत. पोलिसांनी घटनास्थळाच पंचनामा केला. दत्तात्रय हातात कोयता घेऊन जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले. सायंकाळ पर्यंत दत्तात्रया पोलिसांना सापडलेला नव्हता याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरु होती.