आजीच्या गळ्यातील दागिन्यांसाठी नातवानेच तिचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार अहिल्यानगर तालुक्यातील अकोळनेर गावच्या शिवारात घडला. गोदाबाई लक्ष्मण जाधव (वय ९०, रा. माळवाडी, अकोळनेर, ता. अहिल्यानगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे, तर नीलेश बाळासाहेब जाधव (वय २२) असे खून करणाऱ्या आरोपी नातवाचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणी आजीचा मुलगा पोपट लक्ष्मण जाधव यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना माळवाडी येथे शनिवारी (ता. १९) सकाळी घडली. त्यानंतर रविवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली. आरोपी नातू नीलेश याने घरातील सर्वजण कामासाठी घराबाहेर गेल्यानंतर आजीचा गळा दाबून खून केला. आजीच्या गळ्यातील ७० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यासाठी हा खून केला असल्याची कबुली त्याने दिली. अहिल्यानगर तालुका पोलिस ठाण्याच सहायक निरीक्षक प्रल्हाद गिते यांनी आरोपीला अटक केली. सुरुवातीला नीलेश हा उडवाउडवीची उत्तरे देत होता. परंतु गिते यांनी सर्व कुटुंबाची चौकशी केल्यानंतर त्यांचा संशय नातू नीलेश याच्यावर बळावला. अधिक चौकशी केली असता नीलेश याने गुन्ह्याची कबुली दिली. आजीच्या गळ्यातील दागिन्यांसाठी तिचा गळा दाबून खून केला असल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.आरोपी नातू नीलेश हा अवघा २२ वर्षांचा एकुलता एक मुलगा आहे. शनिवारी आई- वडील कामासाठी घराबाहेर गेल्यानंतर त्याने आजीचा गळा दाबून खून केला आणि मृतदेह दिवाणमध्ये लपवून ठेवला. त्यानंतर आजी हरवली असल्याचा बनाव करत तशी सोशल मीडियावर पोस्टही टाकली. दुसऱ्या दिवशी दिवाणमध्ये मुंग्या झाल्याने मृतदेहाविषयी माहिती समोर आली. पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच नीलेशने चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली आहे.