आळंदीमध्ये लग्नसराईत रोज १२०० विवाह, तर इतरवेळी २५० ते ३०० विवाह पार
रात्री-बेरात्रीचेही मुहूर्त; वकिलापासून पोलिस संरक्षनापर्यंत सर्वकाही
पुण्याजवळील आळंदी गावाची गेल्या तीन-चार वर्षांपासून ‘लग्नाचे गाव’ अशी ओळख बनली आहे. इथे लग्नासाठी कोणतेही मुहूर्त पाहिले जात नाही. दिवसाच नव्हे तर रात्री-बेरात्रीही इथे झटपट लग्न उरकून दिले जाते. त्यामुळे या शहराचे अर्थकारण विवाहाच्या व्यवसायावर अवलंबून आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. ४० हजार लोकसंख्या असलेल्या आळंदीत ५५० हून अधिक धर्मशाळा आणि मंगल कार्यालये आहेत. आळंदीमध्ये दररोज २५० ते ३०० विवाह तर, लग्नसराईत दररोज १२०० च्या वर विवाह लागतात. त्यात पंडितपासून ते फोटोग्राफर, डेकोरेशनपर्यंत सर्व पॅकेज एकाच छताखाली उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे प्रेमी जोडप्यांचे, विशेषतः पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांची या ठिकाणी जास्त लगबग दिसते. लग्नानंतर गुरुजींचे विवाह प्रमाणपत्र, विवाहाचे फोटो, मुलीने ऐनवेळी मत बदलू नये म्हणून तिचे शपथपत्रही इथून दिले जाते. इतकेच नव्हे तर घरातून पळून आलेल्या किंवा आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना पोलिस संरक्षण देण्याची ‘सोय’ या ठिकाणी आहे. त्यामुळे कमी खर्चात अधिकृत विवाहाचे ठिकाण म्हणून, आळंदीला ओळख मिळाली आहे.
लग्नाच्या पॅकेजमध्ये सर्व सोयीसुविधा उपलब्ध :
*सिम्पल मॅरेज : ४५०० रुपये । सुविधा : मॅरेज सर्टिफिकेट, पोलिस संरक्षण अर्ज, लग्नविधी व विधीचे संपूर्ण साहित्य.
*स्पेशल मॅरेज : १२,५०० रुपये | मॅरेज सर्टिफिकेट २ प्रती, पोलिस संरक्षण अर्ज, साक्षीदारांसाठी वधू-वरांचे प्रतिज्ञापत्र, मुलीचे शपथपत्र (नोटरी), आंतरजातीय विवाह असेल तर अनुदान अर्जाचा नमुना, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विवाह नोंदणीसाठी फॉर्म डी किंवा ज्ञापन, लग्नाचे १० फोटो, पुरोहिताचे प्रमाणपत्र, लग्नविधीचे पूर्ण साहित्य व ब्राह्मण, हॉल डेकोरेशन आणि जोडप्यांचे व्हिडिओ स्टेटमेंट पेनड्राईव्ह मध्ये दिले जाते.
लग्नापूर्वी घेतले जाते मुलीचे शपथपत्र :
वधू-वर सज्ञान आहेत याचा पुरावा म्हणून अधिकृत कागदपत्रे घेतली जातात. अनेकदा संमतीने पळून आलेल्या जोडप्यातील मुली भावनिक होऊन नंतर मत बदलतात. अशा प्रकरणात मुलावर अपहरणाचा गुन्हा दाखल होतो. हे टाळण्यासाठी कार्यालयाच्या वतीने मुलगी स्वखुशीने लग्न करत असल्याचे शपथपत्र नोटरी करून घेतले जाते. अन्य कायदेशीर बाबीही याठिकाणी तपासल्या जातात.