दारूच्या व्यसनापाई चोरल्या चक्क १५ दुचाकी; कोतवाली पोलिसांकडून आरोपीला अटक

अहमदनगर: दारू पिण्यासाठी पैसे नसल्याने चक्क दुचाकी चोरी करण्याचा सोपा मार्ग एका चोराने निवडला. गंगाराम बंडू कुन्हाडे (वय ३२, रा.मु.पो.टाकळी अंबड, ता.पैठण,जि.छत्रपती संभाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे. कोतवाली पोलिसांनी  गंगाराम  अटक केली आहे. त्याच्याकडून पाच लाख २५ हजार रुपये किमतीच्या १५ चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. कोतवाली पोलिस पेट्रोलिंग करत असताना इम्पिरिअल चौकाजवळ एकजण संशयितपणे फिरत असताना त्यांना दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता, त्याने १५ दुचाकी चोरी केल्याचे समोर आले. सध्या मी काहीच कामधंदा करत नाही. मला दारू पिण्यासाठी व फिरण्यासाठी पैशांची गरज होती. त्यामुळे मी माळीवाडा परिसरातून काही दुचाकींची चोरी केली. चोरलेल्या दुचाकींची विक्री करण्यासाठी मी ग्राहकाची वाट पहात होतो, असा धक्कादायक खुलासा आरोपीने केला आहे. चोरीच्या दुचाकी त्याने शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवलेल्या होत्या. कोतवाली पोलिसांनी पंचासमक्ष वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवलेल्या पाच लाख २५ हजार रुपये किमतीच्या १५ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विकास काळे, उपनिरीक्षक महेश शिंदे, कृष्णकुमार शेंदवाड, सूर्यकांत डाके, विक्रम वाघमारे, विशाल दळवी, योगेश भिंगारदिवे, गणेश धोत्रे, रियाज इनामदार, संगीता बडे, अविनाश वाकचौरे आदींनी ही यावर कारवाई केली.