गौरी-गणपती उत्सवानिमित्त मिळणार आनंदाचा शिधा

लवकरच रेशनवर मिळणार रवा, चणाडाळ, साखर आणि तेल

अहमदनगर : राज्यातील गोरगरीब जनतेला गौरी-गणपती उत्सव आनंदाने साजरा करता यावा, यासाठी राज्य सरकारकडून आनंदाचा शिधा देण्यात येतो. त्यामुळे यंदाही सर्वसामान्य जनतेला १०० रुपयात आनंदाचा शिधा मिळणार आहे. जिल्ह्यासाठी ६ लाख ५४ हजार ५४४ संच मंजूर झाले आहेत, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे यांनी दिली. आनंदाचा शिधा ही योजना २०२२ मध्ये दिवाळी दरम्यान सुरू करण्यात आली होती. ही योजना लोकप्रिय ठरल्याने २०२३ मध्ये गुडीपाडवा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, गणेशोत्सव आणि दिवाळीच्या निमित्ताने ही योजना राबविण्याचे ठरले. राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे, ९ नागपूर
विभागातील वर्धा आणि १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील दारिद्र्यरेषेवरील (एपीएल), केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना आनंदाचा शिधा मिळेल. ५६२ कोटी ५१ लाख रुपये खर्च; प्रतिशिधापत्रिका एक संचाची खरेदी करण्यासाठी ५६२ कोटी ५१ लाख रुपये खर्चास मान्यता देण्यात आली आहे. या संचाचे वाटप ई-पॉस प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे. गौरी-गणपती उत्सवानिमित्त प्रत्येकी १ किलो रवा, चणाडाळ, साखर, १ लिटर सोयाबीन तेल असा आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे.