सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ध्वजदिन निधीसाठी योगदान द्या : जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ
अहिल्यानगर : देशासाठी सीमेवर लढणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने ध्वजदिन निधीसाठी मोलाचे योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले. जिल्हास्तरीय ध्वजदिन निधी २०२४ निधी संकलन कार्यक्रमाचा प्रारंभ जिल्हाधिकारी सालीमठ, पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. मनपा आयुक्त यशवंत डांगे, उप विभागीय पोलिस अधिकारी संपतराव भोसले, साईबाबा संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप भोसले, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी हिरामण झिरवाळ, कर्नल साहेबराव शेळके (निवृत्त), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी स्क्वॉड्रन लिडर वि.ल. कोरडे (निवृत्त) आदी उपस्थित होते. सालीमठ म्हणाले, जिल्ह्यात सैनिक आणि माजी सैनिकांची साधारण १४ हजार कुटुंबे आहेत. त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी ध्वजदिन निधी संकलन महत्वाचे आहे. यावर्षी २ कोटी ८० लाखाचे उद्दीष्ट असले तरी ६ कोटीचा निधी संकलित करण्याचे. उद्दीष्ट ठेवून प्रत्येकाने यात भरीव योगदान द्यावे. पद्मश्री पवार म्हणाले, वीर जवान सीमेवर आणि किसान गावातील शेतात देशासाठी कार्य करतो. या दोघांवर देशाची जबाबदारी आहे. देशासाठी सीमेवर लढताना अनेक बांधवांना वीर मरण येते, तर काहींना कायमचे अपंगत्व येते. अशा सैनिकांच्या कुटुंबियांना मदत करणे हे समाजाचे कर्तव्य आहे. त्यामुळे जिल्ह्यातून अधिकाधिक निधी संकलित व्हावा यासाठी नागरिकांनी योगदान द्यावे आणि माजी सैनिकांना शक्य असेल तिथे सहकार्य करावे.