अहमदनगर (वैष्णवी घोडके)
मुळा धरणाच्या पाटचा-यांना अदयापपर्यंत एकदा ही पाणी न आल्याने आम्हाला आमच्या सुपिक जमिनी तरी परत दया. नाही तर टेलच्या भागापर्यंत पाणी तरी दया अशी मागणी सामनगाव येथील विलास कराळे या शेतक-याने आमदार मोनिका राजळे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सामनगाव व वडुले बुद्रुक शिवारातील शेतीला पाणी मिळावी यासाठी आव्हाणे येथून पाटचारी करण्यात आली आहे. त्यासाठी या दोन्ही गावतल्या शेतक-यांच्या सुपिक जमिनी घेण्यात आल्या आहेत. धरणाच्या व कालव्याच्या निर्मितीपासून अदयापपर्यंत ३० ते ३५ वर्षात फक्त एक ते दोन वेळा त्यास पाणी आले आहे. त्यामुळे या भागातील चा-या म्हणजे निव्वळ शोभेच्या वस्तू बनल्या आहेत.
दरवर्षी मुळा धरणाच्या आवर्तनाच्या वेळी टेल टू हेड असा भरणा करण्याचा नियम असतांना देखील टेलच्या भागाला कधीही पाणी मिळालेले नाही. या भागातील जमिनी काळ्या मातीच्या असल्याने जागोजागी चा-या फुटून त्यात झाडाझुडपांचे साम्राज्य पसरले आहे. पाणी वापर संस्था व पाटबंधारे विभाग वारंवार दुरुस्तीचा खर्च टाकून बील काढण्याचे काम करतात. मात्र शेतक-यांना पाणी मिळत नाही. त्यामुळे या भागातील चा-यांचे पूर्ण काँक्रेटीकरण करुन पूर्ण दाबाने पाणी दया. अन्यथा आमच्या चा-या काढून आमच्या जमिनी आम्हाला परत दया अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले व कार्यकारी अभियंता लघू पाटबंधारे विभाग अ.नगर आदींना दिल्या आहेत.