भंडारा येथील आयुध निर्माणीमध्ये शुक्रवारी भीषण स्फोट

आत्तापर्यंत आठ ठार : तर पाच जखमी

भंडारा शहराच्या दक्षिणेला जवळपास १६ किलोमीटर दूर अंतरावर जवाहरनगर जवळ भंडारा आयुध निर्माणी आहे. या ठिकाणी अतिउच्च दर्जाच्या बारूद आणि स्फोटकांची निर्मिती आणि साठवणूक केली जाते. त्यासाठी वेगवेगळे सेक्शन आणि वेगवेगळ्या इमारती आहेत. यातीलच लो टेंपरेचर प्लास्टिक एक्सप्लोसिव्ह (एलटीपीई) च्या इमारतीत बारूदचे गोळे बनविण्याचे काम सुरू असताना काल सकाळी साडेदहा ते पावणेअकराच्या सुमारास अचानक भीषण स्फोट झाला. हा स्फोट एवढा शक्तिशाली होता की, एलटीपीईची भली मोठी इमारत क्षणार्धात जमीनदोस्त झाली आणि त्यामध्ये काम करणाऱ्या अनेक कामगारांची अक्षरशः राख झाली .शुक्रवारी सकाळी भंडारा येथील आयुध निर्माणीमध्ये भीषण स्फोट झाल्याने आतमध्ये काम करणान्यांपैकी आठ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले. त्यांची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनास्थळावरचे भीषण दृश्य बघता प्रशासनाने मोठ्या प्रमाणात अग्निशमन दलाचे बंब, रुग्णवाहिका आणि मोठ्या क्रेन बोलावून इमारतीच्या मलब्यात दबलेल्याना बाहेर काढण्यासाठी तातडीने बचावकार्य सुरु करण्यात आले होते. यात दबलेल्यांपैकी १३ जणांना बाहेर काढण्यात काल उशिरापर्यंत यश आले. पण अजूनही बरेच कर्मचारी बेपत्ता असून त्यांना मलब्यातून लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थ आणि बचाव यंत्रणा कार्यरत आहे. त्यामध्ये जिवंत सापडलेल्यापैकी बऱ्याच  जणांची प्रकृती अत्यंत गंभीर होती. जखमींना भंडाऱ्यातील लक्ष रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.