मुंबई महापालिकेची कामगारांना दिवाळीची विशेष भेट

कामगारांना 15 हजार 500 रुपये बोनस जाहीर

मुंबई :

 

मुंबई महापालिका कामगारांची दिवाळी कोरोना काळातही सुखी होणार असल्याचे चिन्हे आहेत . कामगारांना यंदा 15 हजार 500 रुपये बोनस देण्यात येणार असल्याची घोषणा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज केली.
यंदा कोरोनाचं संकट असल्यामुळे कामगारांच्या बोनसमध्ये गेल्यावर्षीपेक्षा फक्त 500 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. दिवाळीला अवघे काही दिवस बाकी असताना मुंबई महापालिकेने कामगारांसाठी ही मोठी भेट देऊन कामगारांची दिवाळी गोड केली आहे .
कामगार संघटनांनी पालिका कामगारांना 20 हजार रुपये बोनस देण्याची मागणी केली होती. त्यामुळे चर्चेला तोंड सुटलं होतं. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी करत हा तिढा सोडवला. त्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन कामगारांचा बोनस जाहीर केला.
यानुसार पालिका कामगारांना 15 हजार 500, अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना 7750, शिक्षण खात्यात मनपा प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवकांना 4700 आणि अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवकांना 2350 रुपये बोनस देण्यात येणार आहे.
शिवाय सामाजिक आरोग्य स्वयंसेविकांना भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी 4400 रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा किशोरी पेडणेकर यांनी केली. आज झालेल्या बोनसनुसार पालिका कामगारांच्या बोनसमध्ये गेल्यावर्षीपेक्षा यंदा फक्त 500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
कामगारांच्या बोनसमध्ये यावेळी कपात न करता 500 रुपयांची वाढ करून कामगारांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न मुंबई महानगरपालिकेने केला आहे.