अखेर बिबट्या पिंजऱ्यात 

बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश

अहमदनगर : 

पाथर्डी तालुक्यातील वन विभागाच्या हद्दीत धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला अखेर पकडण्यात आज वन विभागाला यश आले आहे. आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मोहिमेत आज पहाटे हा बिबट्या सावरगाव वन भागात पिंजऱ्यात अडकला.
हा बिबट्या आष्टी वनपरिक्षेत्र विभागाच्या सावरगाव हद्दीत आला होता. तिथे लावलेल्या एका पिंजर्‍यात तो अडकला. या बिबट्याचा वावर हा शिरापूर, करडवाडी, सावरगाव असा होता.
पिंजऱ्यात अडकलेला बिबट्याला तोच आहे का, याबाबत तर्कवितर्क आहेत. त्यामुळे वन विभागाचे पथक पुढील काही दिवस पाथर्डीतील वन क्षेत्रातच तळ ठोकूून राहणार आहे.
शिरापूर येथील सार्थक संजय बुधवंत या चिमुकल्या जीवाला  बिबट्याने आईसमोर उचलून नेले होते. तसेच यापूर्वी केळवंडी आणि मढी येथील दोन बालकांचा या बिबट्याने जीव घेतला आहे.
या बिबट्याला शोधण्यासाठी अहमदनगर, पुणे, जळगाव, औरंगाबाद, बीड यांची पथके नेमण्यात आली होती. सुमारे शंभर कर्मचारी, ड्रोनसह २५ कॅमेरे आणि वन भागात पिंजरे लावण्यात आले होते.