तुळजाभवानीच्या प्रवेशद्वारावर भाजप आध्यात्मिक आघाडीचा बेमुदत ठिय्या

"दार उघड उद्धवा, दार उघड!"

तुळजापूर :

राज्यातील मंदिरं सुरु करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. या मागणीसाठी भाजप आध्यात्मिक आघाडीनं आज  पुन्हा एकदा तुळजापूरमध्ये आंदोलन पुकारलं आहे. 
तुळजाभवानी मंदिर परिसरात भाजप आध्यात्मिक आघाडीचे नेते तुषार भोसले यांच्या नेतृत्वात बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे.
‘दार उघड उद्धवा, दार उघड’ म्हणत हे आंदोलन सुरु करण्यात आलं आहे. भाजप आध्यात्मिक आघाडीच्या आंदोलनाला तुळजापूर पोलिसांनी परवानगी नाकारली होती. पण तरीही तुषार भोसले आणि राज्यातील साधू-महंतांच्या नेृत्वात हे आंदोलन सुरु करण्यात आलं.
मंदिराच्या मुख्य दरवाजावर तुळजाभवानीच्या प्रतिमेची आरती करण्यात आली. त्यानंतर या ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे.  ‘राज्यातील महाविकास आघाडी सरकार कुंभकर्णाप्रमाणे झोपी गेलं आहे. साधू-संतांचा आवाज ऐकायला हे सरकार तयार नाही. साधू-संतांशी चर्चा करा म्हणून दोन वेळा पत्र पाठवली. पण हे सरकार झोपी गेल्याचं सोंग आणत आहे’, अशी टीका तुषार भोसले यांनी केली.