चर्मकार विकास संघाच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्य सचिवांची भेट
राज्याच्या प्रथम महिला मुख्यसचिव सुजाता सौनिक यांचा सन्मान
अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार विकास संघाच्या वतीने महाराष्ट्र राज्याच्या प्रथम महिला मुख्यसचिव सुजाता सौनिक यांचा सन्मान करण्यात आला. तर चर्मकार समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
चर्मकार विकास संघाच्या शिष्टमंडळाने सौनिक यांची मंत्रालयात नुकतीच भेट घेतली. यावेळी चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, मुंबई प्रदेशाध्यक्ष सुभाष मराठे, नगरसेविका आशाताई मराठे, महिला कार्याध्यक्षा पुजाताई कांबळे, डॉ. प्रवीण धाडवे (परभणी) आदी उपस्थित होते.
चर्मकार विकास संघाच्या वतीने संत रविदास महाराज यांच्या जयंतीची शासकीय सुट्टी द्यावी, संत रविदास महाराज यांचे महाराष्ट्रातील जिल्हास्तरावर स्मारक व विकास केंद्र उभारण्यात यावे, चर्मोद्योग महामंडळाचे सर्व थकीत कर्ज सरसकट विनाशर्त माफ व्हावे, कष्टकरी गटई कामगारांना महानगरपालिका क्षेत्रात तसेच इतर सर्व शहर व गाव पातळीवर अधिकृत पीच परवाना (गटई स्टॉल) देण्यात यावे, अपघात विमा, आरोग्य विमा, पेन्शन योजना, घरकुल योजनेचा लाभ मिळावा, चर्मोद्योग महामंडळाचे सर्व कर्ज महामंडळाच्या मार्फत देण्यात यावे व जाचक अटी रद्द कराव्या, देवनार (मुंबई) येथील आधुनिक लेदर पार्कला निधी उपलब्ध करून लेदर पार्कच्या कामाला सुरूवात करावी, महाराष्ट्र राज्य बाल चित्रकला स्पर्धेत चर्मकार समाजाबद्दल असंविधानिक शब्दाचा उल्लेख करणाऱ्या दोषी अधिकारीवर कठोर कारवाई करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
या प्रश्नांसह प्रामुख्याने युवक व महिलांच्या विकास, न्याहक्क व सन्मानाच्या विविध प्रश्नावर सकारात्मक चर्चा करण्यात आली. याप्रसंगी सुजाता सौनिक यांनी समाजाचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शिष्टमंडळास आश्वासन दिले. सौनिक यांना संत गुरु रविदास महाराज यांची मूर्ती भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.