अवघ्या २० दिवसांनी बालविवाहाची घटना हेल्पलाइनवरील तक्रारीमुळे उघडकीस आली!

ग्रामविकास अधिकाऱ्याची तक्रार; नवरदेव आणि नातेवाइकांसह ३० जणांवर गुन्हा दाखल

बीड जिल्ह्यात शिरूर तालुक्यातील शिंगारवाडी येथील शृंगारऋषी मठात गेवराई तालुक्यातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावला. हेल्पलाइनवर आलेल्या तक्रारीमुळे हा प्रकार २० दिवसांनी उघडकीस आला. या प्रकरणी नवरदेवासह त्याचे नातेवाईक आणि वऱ्हाडी मंडळी अशा एकूण ३० जणांवर ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. शिंगारवाडीतील शृंगारऋषी मठात ११ सप्टेंबरला गेवराई तालुक्यातील १७ वर्षीय मुलीचा बालविवाह लावण्यात आला. याबाबत हेल्पलाइनवर तक्रार आली होती. तक्रारीच्या अनुषंगाने बीडच्या चाइल्डलाइनने शिंगारवाडी येथील ग्रामविकास अधिकारी दिलीप मिसाळ यांना कारवाई करण्याचे पत्र दिले. वरिष्ठांच्या सूचनेवरून ग्रामविकास अधिकारी मिसाळ यांनी बालविवाहप्रकरणी चौकशी केली. बालविवाहाचे फोटो मिळवत नवरी अल्पवयीन असल्याचा शालेय कागदपत्रांचा पुरावा मिळवेला. या प्रकरणी चकलांबा पोलिस ठाण्यात ग्रामविकास अधिकारी मिसाळ यांनी तक्रार दिली. त्यानंतर गुन्हा दाखल झाला. फोटोग्राफर, पुरोहित अडकले बालविवाहातील नवरदेव वैजनाथ बाचकर, त्याचे वडील अशोक बाचकर, आई हिराबाई बाचकर, चुलते सदाशिव बाचकर, मामा शहादेव महानोर, नवरीचे आई-वडील, आत्या, मामा यांच्यासह अंकुश यमगर, बप्पासाहेब महानोर, फोटोग्राफर, आचारी, लग्न लावणारा पुरोहित यांच्यासह ३० वऱ्हाडी मंडळींवर गुन्हा दाखल झाला.