अहमदनगर महाविद्यालयाच्यावतीने स्वच्छता अभियान; प्लास्टिक मुक्त परिसराचे उद्दिष्ट !

अहमदनगर : ‘स्वच्छता ही सेवा’ या राष्ट्रीय मोहिमेअंतर्गत अहमदनगर महाविद्यालयात आज विशेष स्वच्छता अभियान यशस्वीरित्या पार पडले. स्टेट बँक ऑफ इंडिया ते अहमदनगर महाविद्यालय परिसरात स्वच्छतेचा व्यापक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात प्लास्टिकचा कचरा गोळा करण्यावर विशेष भर देण्यात आला, ज्यामुळे परिसराला प्लास्टिकमुक्त करण्यात हातभार लागला. या उपक्रमामध्ये राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास मंडळ आणि राष्ट्रीय छात्र सेना योजनेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी केवळ परिसराची स्वच्छता केली नाही, तर प्लास्टिक सारख्या हानिकारक घटकांपासून पर्यावरणाचे रक्षण करण्याचा महत्त्वाचा संदेश दिला. त्यांनी रस्त्यांवर, झाडांखाली, आणि इतर सार्वजनिक ठिकाणी साचलेला प्लास्टिक कचरा गोळा करून परिसर स्वच्छ आणि सुशोभित केला. या उपक्रमाचे आयोजन अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.यशवंत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नाबस यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना “प्लास्टिक कचऱ्याचे दीर्घकालीन पर्यावरणीय दुष्परिणाम स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की,प्लास्टिकचा वापर कमी करणे आणि योग्य पद्धतीने त्याची विल्हेवाट लावणे काळाची गरज आहे. तसेच अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये फक्त समाजसेवेचीच नव्हे, तर पर्यावरण संवर्धनाची देखील जाणीव निर्माण होईल. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी उपप्राचार्य डॉ.नोएल पारगे, उपप्राचार्य प्रा. दिलीपकुमार भालसिंग, विनाअनुदानित विभाग प्रमुख डॉ.रझाक सय्यद, ई.टी.आय.प्रमुख डॉ.गोकुळदास गायकवाड, राष्ट्रीय छात्र सेना प्रमुख डॉ.माधव जाधव, विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी डॉ. भागवत परकाळ, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. पोपट सिनारे. डॉ.प्रबंधिका शेलार डॉ.रविंद्र मते आदींनी प्रयत्न केले.