चित्रा नक्षत्रात, जिल्ह्यात परतीच्या पावसाचा जोर
नेवासे तालुक्यात १० शेळ्या, २ मेंढया ठार
अहिल्यानगरमध्ये काल परतीच्या पावसाने जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. विजांच्या कडकडाटांसह शहर व परिसरात दोन तास चांगला पाऊस झाला. जामखेड, अहिल्यानगर तालुका, नेवासे, श्रीरामपूर, कर्जत तसेच इतर भागातही पावसाने हजेरी लावली. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे. काही ठिकाणी वीज पडून जनावरे दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. काही पिकांना सध्या पावसाची गरज होती. भरणे होणे आवश्यक होते. बहुतेक तालुक्यांतील विहिरी, तळी यापूर्वीच्या पावसाने भरलेली आहेत. आजच्या पावसाने उशिरा लागवड झालेल्या कांद्याचे भरणे झाले असले, तरी लवकर लागवड केलेल्या कांद्याला फटका बसणार आहे. काही ठिकाणी शेतात पाणी साचल्यामुळे नुकसान झाले आहे. शेवगाव, पाथर्डी, जामखेड आदी भागात कपाशी लागवड मोठ्या प्रमाणात झालेली आहे. या पावसाने वेचणीला आलेल्या कपाशीचे नुकसान होणार असल्याने शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात काढणीस आलेले सोयाबीन, कपाशी पिकांचा समावेश आहे. याशिवाय नेवासे तालुक्यातील रांजणगाव देवी भागात दुपारच्या सुमारास झालेल्या पावसात वीज पडून १० शेळ्या व दोन मेंढ्या ठार झाल्या, तर चार मेंढ्या जखमी झाल्याची घटना घडली आहे. रांजणगावदेवी येथील मेंढपाळ रामकिसन खोसे व इतर काही जणांच्या शेळ्या व मेंढ्या रांजणगावच्या निमटोकी माळावर चरण्यासाठी गेल्या होत्या. शेळ्या-मेंढ्या चरत असतांना दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान अचानक विजेच्या कडकडाटांसह पावसाला सुरुवात झाली. त्यातच एक वीज शेळ्या- मेंढ्याच्या कळपावर कोसळली. त्यात रामकिसन पोपट खोसे यांच्या तीन शेळ्या, संतोष दिलीप खरात यांची एक शेळी, अक्षय सोपान पंडित यांच्या तीन शेळ्या, सचिन बाबासाहेब खोसे यांच्या तीन शेळ्या, बाबासाहेब शिवाजी पंडित यांच्या दोन मेंढ्या ठार झाल्या आहेत. तर अजित दत्तू पंडित यांच्या चार मेंढ्या जखमी झाल्या आहेत. वीज पडून ९ शेळ्या व २ मेंढ्या मृत्युमुखी पडल्याने मेंढपाळांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पशुधन विकास अधिकारी डॉ. अमोल गायकवाड, डॉ. तेजस घुले, डॉ. शरद औताडे, डॉ. मच्छिंद्र सोनवणे, डॉ. कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन मृत शेळ्या-मेंढ्याचा पंचनामा व शवविच्छेदन केले.